मिठमुंबरी-बागवाडी जेटी प्रकरणी मच्छिमारांवरील गुन्ह्यांचा ठाकरे शिवसेनेकडून निषेध!
मालवण,दि.२९ ऑक्टोंबर
देवगड तालुक्यातील मिठमुंबरी – बागवाडी येथील जेटीवर प्रस्तावित कायाकिंग प्रकल्पावरून सुरु असलेल्या वादात स्थानिक मच्छिमारांवर गुन्हे दाखल केले गेल्याने याचा ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी निषेध व्यक्त केला आहे. आपल्या मागण्यांसाठी मिठमुंबरी बागवाडी येथील मच्छिमार व ग्रामस्थांनी पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाला ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी येथे कायाकिंग प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी या प्रकल्पास विरोध केल्याने वाद झाला होता. याप्रकरणी काही स्थानिक मच्छिमार ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर स्थानिक मच्छिमार व ग्रामस्थ यांनीही पोलीसांना निवेदन देत आपणास धमकावणाऱ्या संबंधित बाहेरील व्यक्तींविरुद्ध चौकशी करून कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी मिठमुंबरी येथील ग्रामस्थ व स्थानिक पारंपारिक मच्छीमारांनी केली असून दोन दिवसांत संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मच्छिमारांच्या जेलभरो आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
कायाकिंग प्रकल्पामुळे स्थानिक मच्छिमारांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मच्छिमारांचा विरोध योग्य आहे. तसेच केवळ विरोध केला म्हणून मच्छिमारांना धमकावणे ही गंभीर बाब आहे. आपल्या न्याय हक्कासाठी भांडणाऱ्या मच्छिमारांवर गुन्हे दाखल करणे निषेधार्ह व निंदनीय आहे. म्हणूनच ठाकरे शिवसेना मच्छिमारांच्या भूमिकेच्या पाठीशी असून जेलभरो आंदोलनाला आमचा पाठिंबा असून प्रसंगी आम्हीही या आंदोलनात सहभागी होऊ, असेही हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.