कणकवली,दि.०२ जुलै
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बुद्धिबळ इतिहासात अभिमानाचा क्षण ठरावा अशी कामगिरी आर्चिर्णे हायस्कुलचा विद्यार्थी युवा बुद्धिबळपटू विहान राहुल अस्पतवार याने केली आहे. अवघ्या 9 व्या वर्षी विहानने ‘फिडे क्लासिकल रेटिंग’ – 1541 प्राप्त करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंडर-10 गटातील पहिला’फिडे क्लासिकल रेटिंग’ आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारा बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवला आहे.
नुकत्याच सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत विहानने हे मानांकन मिळवले. या कामगिरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बुद्धिबळ क्षेत्रात नवा इतिहास रचला गेला असून, जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा आणि सुवर्णक्षण ठरला आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केलेल्या विहानने ग्रामीण भागात राहूनही सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर अवघ्या तीन वर्षांत हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. मर्यादित साधनसामग्री असूनही आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणे ही त्याची प्रेरणादायी कामगिरी मानली जात आहे.
या यशामागे विहानच्या आई-वडिलांचा कायमस्वरूपी विश्वास, त्याग, प्रोत्साहन आणि प्रत्येक स्पर्धेत दिलेला भक्कम पाठिंबा हे महत्त्वाचे कारण ठरले. त्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच विहानला आपल्या खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करून हे यश संपादन करता आले.विहानच्या बुद्धिबळ प्रवासाची प्रेरणा प्रदीप पाटील यांना आदर्श मानून मिळाली. त्यानंतर शिक्षक बाबुराव पाटील (कोल्हापूर ),अविजीत रे (गोवा), श्रीकृष्ण आडेलकर (कणकवली) आणि विजयकुमार माने (सांगली )यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या खेळात सातत्याने प्रगती होत गेली आणि या ऐतिहासिक यशाला गवसणी घालता आली.
विहानच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातील बुद्धिबळ क्षेत्रातून, विविध क्रीडा संघटना, प्रशिक्षक, बुद्धिबळपटू, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना तसेच सर्व स्तरांतील मान्यवरांकडून कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना बुद्धिबळ क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी उल्लेखनीय कामगिरी करून सिंधुदुर्ग, महाराष्ट्र आणि भारताचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून विहान राहुल अस्पतवार याला दिल्या जात आहेत. सध्या तो वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे हायस्कूल येथे शिकत आहे.