कणकवली नगरपंचायतच्या इशारानंतर स्टॉल धारकांनी आपले स्टॉल हरवले

शेअर करा

कणकवली ,दि.१८ जुलै

कणकवली शहरातील महामार्ग उड्डाण पुलाखाली उभारण्यात आलेले स्टॉल अखेर स्टॉलधारकांनी स्वतःहून हटवले आहेत. नगरपंचायत प्रशासनाने शुक्रवारी संबंधित स्टॉलधारकांना एक दिवसाची मुदत दिली होती. या मुदतीनंतर कारवाई अटळ असल्याचा इशारा देण्यात आला होता. नगरपंचायतीच्या सूचनेनंतर शनिवारी दिवसभरात स्टॉलधारकांनी स्वतःच आपले स्टॉल उचलण्यास सुरुवात केली.

त्यामुळे उड्डाण पुलाखालील परिसर मोकळा होण्यास मदत झाली असून वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, सोमवार २० जुलैपासून उड्डाण पुलाखाली नियमबाह्य पद्धतीने उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पोलिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी(आरटीओ) आणि नगरपंचायत प्रशासन एकत्रितपणे मोहीम राबविणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा ठराव कणकवली नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यामुळे उड्डाण पुलाखाली अतिक्रमण व अनधिकृत वाहनतळ बंद करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा