कणकवली : स्मार्ट मीटरची सक्ती थांबा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

शेअर करा

ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा ; ग्राहकांची परवानगी न घेता मीटर बसविल्याचा आरोप

कणकवली,दि.१६ जून

वीज ग्राहकांची परवानगी न घेता अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला.

सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन राऊत यांची भेट घेत स्मार्ट मीटरबाबत जाब विचारला. यावेळी प्रभारी उपकार्यकारी अभियंता एम. एम. सावंत, शाखा अभियंता ओमकार स्वामी यांच्यासह नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, दिव्या साळगावकर, राजू राठोड, महेश कोदे आदी उपस्थित होते.

यावेळी शिष्टमंडळाने अदानी कंपनीचे कर्मचारी ग्राहकांची एनओसी न घेता थेट स्मार्ट मीटर बसवत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकांची परवानगी नसल्यास स्मार्ट मीटर बसवू नयेत, असे आवाहन केले असल्याचे सांगत, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहकांना ४८ तासांच्या आत स्मार्ट मीटर बसविण्याचे संदेश पाठविले जात असल्याचा दावा करण्यात आला.

“स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये मोठी वाढ होत असल्याची भावना ग्राहकांमध्ये आहे. ग्राहकांचा विरोध असताना सक्तीने मीटर बसविणे योग्य नाही. कणकवली शहरात सुरू असलेली ही प्रक्रिया तातडीने थांबवावी,” अशी मागणी सुशांत नाईक यांनी केली.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय अदानी कंपनीचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसवू शकत नाहीत, असा आरोप करत त्यांनी महावितरणची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. तसेच स्मार्ट मीटर सक्तीबाबत शासनाचा कोणता आदेश अथवा राजपत्र आहे का? अदानी कंपनीवर महावितरणचा नियंत्रण आहे का? असे प्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले.

यावेळी महावितरणकडून शासनाकडून प्राप्त राजपत्राची माहिती शिष्टमंडळाला देण्यात आली. मात्र ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेने दिला आहे.

शेअर करा