डामरे ग्रामस्थांनी तहसिलदारांना दिले विशेष कृतज्ञता सन्मानपत्र ; २०२१ पासून प्रलंबित असलेला बंद रस्त्याचा तडजोडीने प्रश्न निकाली ...
कणकवली ,दि.०३ ऑगस्ट
सन २०२१ पासून प्रलंबित असलेला गावातील मुख्य रस्ता अडथळ्याचा प्रश्न कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या पुढाकाराने आणि समन्वयातून मार्गी लागला आहे. त्यामुळे डामरे गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत विशेष कृतज्ञता सन्मानपत्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीक्षांत देशपांडे यांना देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत, सरपंच किरण कानडे, उपसरपंच संतोष मेजारी, माजी उपसरपंच सागर साटम, पोलीस पाटील विश्वास सावंत, विनायक पारधिये, निलेश साहील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी महसूलमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, गावातील शेतात जाण्याचा मार्ग, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तसेच गणपती विसर्जनासाठी वापरला जाणारा प्रमुख मार्ग काही काळापासून अडथळ्यामुळे बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागत होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत दोन्ही बाजूंच्या संबंधितांशी संवाद साधला. त्यांच्या संयमी मध्यस्थी आणि कुशल समन्वयामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वाद मिटविण्यात यश आले. यामुळे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी सन्मान पत्राद्वारे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या लोकाभिमुख, संवेदनशील आणि कार्यक्षम प्रशासनाचे कौतुक केले. महसूल विभागातील अशा कर्तव्यदक्ष अधिकारीजणून कार्याची विशेष दखल घेऊन त्यांचा महसूलमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात करण्यात आला.
