कणकवली,दि.०१ ऑगस्ट
अणुऊर्जा प्रकल्प करणे हा भाजपचा अजेंडा आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोध करणाऱ्यांवर राज्यातील महायुतीचे सरकार राजकीय दबाव आणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. अणुऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यास ठाकरे शिवसेना गप्प बसणार नाही. तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्याविरोधात ठाकरे शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक उपस्थित होते.
उपरकर म्हणाले, देवगडवासीयांचा मुगणेतील प्रस्ताविक अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे. या प्रकल्पाची जागा अद्यापही निश्चित करण्यात आलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. मात्र, भाजपच्या तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली एका व्यक्तीने याठिकाणी या प्रकल्पाचा बॅनर लावला. या बनरवाल्याला ग्रामस्थांनी जाब विचारला. मात्र, पालकमंत्री नितेश राणे यांच्या राजकीय दबावामुळे ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी गणेश गावकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्राॅसिटीचा खोटा गुन्हा देवगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गावकर हे मिठमुंबरीत राहतात. बॅनर लावण्याचा प्रकार हा मुगणेत घडला. राजकीयदृष्टया गणेश गावकर यांना अडकविण्याचा प्रयत्न सत्ताधाºयांकडून झाला आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाºया ग्रामस्थांवर राजकीय दबाव आणण्याचा काम पालकमंत्र्यांकडून केले जात आहे, असा आरोप उपरकर यांनी केला. गावकर यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे हे पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आणून गावकर यांना अटक करण्यासाठी भाग पाडत आहेत. गावकर यांच्यावर दाखल झालेल्या अॅट्राॅसिटीच्या गुन्हावरून अनुसूचित जातीच्या दोन्ही संघटनांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. समाजाच्या दोन्ही संघटनांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उघड झाले आहे. पालकमंत्र्यांनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पक्षभेद विसरून ग्रामस्थांना सोबत घेऊन देवगड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू काढणार आहोत. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाºयांचा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न सरकार, पालकमंत्री करीत असतील तर ठाकरे शिवसेना मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्याविरोधात ग्रामस्थांनासोबत घेऊन आंदोलन करेल, असा इशारा उपरकर यांनी दिला आहे.
अणूऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्प विरोधकांचा आवाज दडपून टाकण्याचे काम सरकारकडून केले जात असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला. पोलिसांनी गणेश गावकर यांच्यावर अटकेची कारवाई केली तर आम्ही प्रकल्पविरोधी ग्रामस्थांना घेऊन मोर्चा काढू, असा इशारा नाईक यांनी दिला. तसेच पालकमंत्र्यांवर नाईक यांनी हल्लाबोल केला.