1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ;स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कारवाई
कणकवली,दि.१३ ऑगस्ट
गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1.798 किलो ग्रॅम गांजा तसेच दोन दुचाकी असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांगो मंदिर ते गणपती साना जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत टेंबवाडी येथील आम्रपाली सोसायटीजवळ काही इसम गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन दोन पंच व प्रमाणित वजनकाटाधारक यांना सोबत घेत पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला.
यावेळी संशयित सूर्यकांत राघो घाडीगावकर (वय 29, रा. वागदे-देऊळवाडी, ता. कणकवली) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला त्यांच्या दोन दुचाकींसह ताब्यात घेण्यात आले. झडती दरम्यान दोन पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये हिरवट रंगाचा, उग्र वास येणारा गांजा आढळून आला. वजन केल्यानंतर गांजाचे वजन 1.798 किलो ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी 60 हजार रुपये किमतीचा गांजा, 80 हजार रुपये किमतीची यमाहा फॅसिनो दुचाकी (MH 07 AQ 4088) आणि 40 हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर दुचाकी (KA 32 HH 1214) असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलिस अधिकारी डॉमीनिक डिसोझा, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गोसावी, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्सालवीस तसेच पोलीस कॉन्स्टेबल समजिस्कर व कांडर यांच्या पथकाने केली.