जमीन विक्री बंदी बाबत निर्णय घेणारे जिल्ह्यातील असलदे हे पहिले गाव; या विषयी ग्रामस्थांच्या एकजुटीचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
कणकवली,दि.१४ ऑगस्ट
कणकवली तालुक्यातील असलदे गावातील जमीन विक्रीच्या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने निर्णय घेतला आहे. आपली गावची जमीन, गावचा विकास आणि पुढील पिढ्यांचे भवितव्य जपण्यासाठी ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट ही कौतुकास्पद आहे.जमीन विक्री विरोधात निर्णय घेत असलदे गावाने जिल्ह्यासमोर आदर्श निर्माण केला आहे,असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.
नांदगाव तिठा येथे कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, असलदे गावातील जमिनी बाहेरील व्यक्तींना विक्री होऊ नयेत, गावातील जमिनी गावकऱ्यांच्याच हक्कात व उपयोगात राहाव्यात, तसेच गावाचा सामाजिक आणि सांस्कृतिक समतोल अबाधित राहावा, यासाठी गावचे सरपंच व ग्रामस्थांनी सामूहिक भूमिका घेतली आहे. असलदे गावाने घेतलेली ही भूमिका जिल्ह्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी आहे, हा असलदे गाव जिल्ह्यात आदर्शवत आहे असा संदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.