कुणाच्याही दबावात येऊन २३ नंबर नोंद रद्द करू नका;
ठाकरवाडीतील ग्रामस्थांचे सरपंच महेश गुरव यांना निवेदन..
कणकवली,दि.१५ जुलै
आशिये ग्रामपंचायत हद्दीतील ठाकरवाडी येथील सार्वजनिक रस्त्याची ग्रामपंचायत रजिस्टरमधील २३ नंबरला केलेली नोंद कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये, अशी मागणी ठाकरवाडीतील ग्रामस्थांनी सरपंच महेश गुरव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशिये मुख्य रस्त्यापासून प्रविण ठाकर यांच्या घरापर्यंत जाणारा सार्वजनिक रस्ता हा गट क्रमांक १५७ (अ) मधून जात असून, या रस्त्यासाठी अंदाजे ३ ते ३.५ गुंठे क्षेत्र वापरण्यात आले आहे. या रस्त्याची ग्रामपंचायत रजिस्टर क्र. २६/२३ मध्ये नोंद असून, संबंधित जमीनधारक लक्ष्मण ठाकर, सदानंद ठाकर व कै. विजय ठाकर यांनी लेखी संमती दिल्यानंतर ही नोंद करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) या रस्त्याचा विकास करण्यात आला असून, शासनाचा निधी खर्च करून रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. त्यामुळे हा सार्वजनिक रस्ता असल्याने त्याची नोंद रद्द करणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हा रस्ता सदानंद ठाकर, प्रशांत ठाकर, प्रविण ठाकर यांच्या घरांपर्यंत तसेच सावित्री नारायण ठाकर यांच्या जमिनीपर्यंत जातो. याच रस्त्यापासून वाडीतील इतर अंतर्गत रस्त्यांची सुरुवातही होते. त्यामुळे या रस्त्याची नोंद रद्द झाल्यास वाडीतील अनेक कुटुंबांचा ये-जा मार्ग बंद होईल. त्याचा नागरिकांच्या दळणवळणावर, आपत्कालीन आरोग्य सेवांवर, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत रजिस्टरमधील सार्वजनिक रस्त्याची नोंद कायम ठेवावी व ती कुणाच्याही दबावाखाली येऊन रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा या प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर ७० ग्रामस्थांनी सह््या केल्या आहेत.