जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव ; सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक
कणकवली,दि.०२ ऑगस्ट
आम्ही जिल्हा बँकेचे मालक नाही, तर विश्वस्त आणि सेवक म्हणून काम करत आहोत. आमच्याकडे सोपविलेली जबाबदारी पुढच्या पिढीकडे अधिक सक्षम स्थितीत सोपविणे, हेच आमचे ध्येय आहे. सहकाराला समृद्धी देत त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साध्य करण्यासाठी यापुढेही एकजुटीने काम करुयात असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात मनीष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रवींद्र मडगावकर, विठ्ठल देसाई, प्रकाश मोरये, आत्माराम ओटवणेकर, समीर सावंत, गणपत देसाई, विद्याधर परब,व्हीक्टर डान्टस,संदिप परब, विद्याप्रसाद बांदेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यासह जिल्हाभरातील बँकेचे अधिकारी व कर्मचारी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
मनीष दळवी म्हणाले, मला वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या आर्शिवाद रुपी मिळालेल्या शुभेच्छा पुढील कामासाठी ऊर्जा देत आहेत, त्याचबरोबर जबाबदारीही वाढवितात. आपल्या पदाचा उपयोग केवळ दैनंदिन कामकाजापुरता न करता समाजाच्या हितासाठी कसा करता येईल, याचा विचार करण्याचे मार्गदर्शन खा. नारायण राणे यांनी वेळोवेळी केले. त्यातूनच संस्थेच्या कामकाजाला व्यापक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला.
पाच वर्षांत व्यवसायवाढीचा वेग कायम –
गेल्या पाच वर्षांत जिल्हा बँकेचा व्यवसाय, कर्ज व्यवहार, आर्थिक उलाढाल, नफा आणि उत्पन्न दुपटीपर्यंत नेण्यात यश आले. बदलत्या काळानुसार बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यावर भर दिला आहे. ग्राहक, शेतकरी, महिला आणि युवकांना बँकेशी व्यवहार करणे सुलभ व्हावे आणि आधुनिक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढविण्यात येत आहे. या काळात बँकेने सातत्याने १७ ते १८ टक्के, तर काही वर्षांत २० टक्क्यांपर्यंत व्यवसायवाढ साध्य केली. ही कामगिरी केवळ संचालक मंडळाची नसून बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात विविध राजकीय पक्षांतील प्रतिनिधी असले तरी संस्थेच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले. ही कोणाची वैयक्तिक संस्था नसून जिल्ह्यातील शेतकरी, गरीब शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक आणि महिलांची संस्था आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून बँकेच्या विकासाला प्राधान्य दिले, यामुळे ‘सहकारातून जिल्ह्याची समृद्धी’ असे काम सुरु असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.
यावेळी आ. उपाध्याय, संजू परब, बॅंक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, गजानन गावडे, नागेश मोरये यांनी विचार व्यक्त केले.