अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही आरोपी मोकाट; आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन
कणकवली,दि.१७ जुलै
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील ठेकेदारांनी केलेल्या बनावट सही प्रकरणात गुन्हे दाखल होऊन अटक झालेली नाही. आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतरही अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यामुळे तपासाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित आरोपींना कोणाचे संरक्षण कोणाचे आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असल्याचे युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी सांगितले.
कणकवली येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात ते बोलत होते, या प्रकरणात सुमारे १५ ते १६ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा झाला आहे. मुळात गुन्हा दाखल होण्यास तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतरही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.या प्रकरणी पालकमंत्री आणि सरकार सक्षम असताना आरोपींवर अटकेची कारवाई का केली जात नाही? संबंधित आरोपींना अटक व्हावी , यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर “चार दिवसांत अटक करू,” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप उत्तम लोके यांनी केला.
या प्रकरणातील संबंधित ठेकेदार कोणालाही जुमानत नाही. सरकार आणि प्रशासनालाही तो भीक घालत नाही. एवढा प्रभावशाली व्यक्ती कोण आहे? पोलिस प्रशासनाकडून आरोपींना संरक्षण दिले जात असून, त्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळत आहे. खा. नारायण राणे यांनीही जिल्ह्यातील रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी उत्तम लोके यांनी केली. संबंधित आरोपींना तातडीने अटक करून निष्पक्ष तपास करावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.