कळसुलीत भोगनाथ व दिंडवणे शाळांचा अभिनव उपक्रम; पालकांच्या सहभागाने कार्यक्रम ठरला यशस्वी
कणकवली ,दि.०५ ऑगस्ट
शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे असावे, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळसुली भोगनाथ क्रमांक ३ आणि दिंडवणे केंद्र शाळा क्रमांक २ यांनी पालकांच्या सहकार्याने कळसुली ग्रामपंचायत कार्यालयासमोर रानभाज्या व परसबागेतील भाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री हा अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातून विविध रानभाज्या गोळा करून त्यांची माहिती देत प्रत्यक्ष विक्री केली. या माध्यमातून व्यवहारज्ञान, उद्योजकता, पोषणमूल्यांची जाणीव आणि संवाद कौशल्याचा अनोखा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
या उपक्रमाचे उद्घाटन कळसुली हायस्कूलचे चेअरमन के. आर. दळवी यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना के. आर. दळवी म्हणाले, “आज कोणतीही पदवी घेतली तरी सरकारी नोकरी मिळेल याची शाश्वती नाही. मात्र ज्याच्याकडे कौशल्य आहे, तो कधीही उपाशी राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेले कौशल्य ओळखून त्याला योग्य दिशा देणे आणि स्वावलंबी बनविणे ही शिक्षण व्यवस्थेची खरी जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले, “रानभाज्या या केवळ अन्न नसून त्या आपल्या पारंपरिक ज्ञानाचा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहेत. आयुर्वेदामध्ये रानभाज्यांना विशेष महत्त्व आहे. विविध आजारांवर गुणकारी ठरणाऱ्या या भाज्यांची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमातून निसर्ग, आरोग्य आणि उद्योजकता यांचा सुंदर संगम अनुभवला आहे. हेच खरे जीवनोपयोगी शिक्षण आहे.”
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, लहान वयातच विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील रानभाज्या गोळा करून त्यांची विक्री करण्याचे धाडस दाखविले. या प्रक्रियेत त्यांना भाज्यांची ओळख, ग्राहकांशी संवाद, विक्रीचे कौशल्य, पैशांचा व्यवहार आणि आत्मविश्वास मिळाला. या उपक्रमात शिक्षकांसोबत पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला वेगळी उंची मिळाली. ग्रामीण भागात अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.
भोगनाथ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक टोनी म्हापसेकर म्हणाले, “विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबरच जीवनातील व्यवहाराचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषणमूल्ये, आर्थिक व्यवहार, ग्राहकांशी संवाद आणि स्वावलंबनाचे धडे मिळाले. पालकांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकारला असून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराची जाणीव निर्माण करण्याचाही आमचा प्रयत्न आहे.”
ग्रामसेवक प्रशांत वर्दम यांनी सांगितले की, ग्रामीण भागात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. बाजारातील रासायनिक खतांचा वापर करून पिकविलेल्या भाज्यांपेक्षा नैसर्गिक वातावरणात वाढलेल्या भाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
प्रदर्शनात तांदुळजा, कुरडू, भारंगी, टाकळा, शेवळा, फोडशी, अळू, कोल्हा, चिचणी यांसह विविध रानभाज्या आणि परसबागेतील भाज्यांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. प्रत्येक भाजीचे पोषणमूल्य, औषधी उपयोग आणि उपयोगिता विद्यार्थ्यांनी उपस्थितांना समजावून सांगितली. अनेक ग्रामस्थांनी या भाज्यांची खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, आर्थिक व्यवहाराचे प्राथमिक ज्ञान, उद्योजकतेची आवड आणि आरोग्यदायी आहाराबाबत जागरूकता निर्माण झाली. शिक्षणाला प्रत्यक्ष जीवनाशी जोडणारा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश दळवी, उपसरपंच राजेंद्र दळवी, माजी सरपंच अतुल दळवी, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर परब, ग्रामपंचायत सदस्या दिक्षा तांबे, भारती देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर सुद्रिक, मुख्याध्यापक दिनेश सुद्रिक, ग्रामसेवक प्रशांत वर्दम, जिल्हा बँक शाखा व्यवस्थापक मिलिंद जांभवडेकर, रजनीकांत सावंत, अनिल सावंत, नामदेव घाडीगावकर, लक्ष्मण घाडीगावकर, अरुण दळवी, बाबू कळसुलकर, कृष्णा घाडीगावकर, शैलेश दळवी, शिक्षक रविंद्र मोरे, शिक्षिका योगिता माळी, विद्यार्थी, पालक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.