कणकवलीचा लोकनायक… जनतेच्या मनातील नगराध्यक्ष संदेश पारकर!

शेअर करा

पदापेक्षा जनसंपर्क, राजकारणापेक्षा समाजकारण आणि विकासालाच सर्वोच्च प्राधान्य; कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या नेतृत्वाचा वाढदिवसानिमित्त विशेष आढावा


कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस म्हणजे कणकवलीकरांसाठी केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो, तर तो एक प्रकारचा उत्सवच असतो. पद असो वा नसो, संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचा उत्साह आणि जनसहभाग कधीच कमी झाला नाही. कारण त्यांनी राजकारणापेक्षा माणसं जोडण्याला अधिक महत्त्व दिलं. प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारा, संकटात खंबीरपणे उभा राहणारा आणि सर्वसामान्यांच्या अडचणी स्वतःच्या समजून त्यावर उपाय शोधणारा नेता म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

याच जनसंपर्काच्या बळावर कणकवलीकरांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी शहराच्या विकासाला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिली आहे. त्यामुळेच आज संदेश पारकर हे केवळ नगराध्यक्ष नसून कणकवलीच्या जनतेच्या मनातील लोकनायक म्हणून ओळखले जात आहेत.

कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महत्त्वाचे व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र आहे. वाढती लोकसंख्या, विस्तारत चाललेले शहर आणि बदलत्या नागरी गरजा लक्षात घेता आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान नगरपंचायतीसमोर आहे. ही जबाबदारी स्वीकारत संदेश पारकर यांनी विकासाला प्राधान्य देणारी कार्यपद्धती अवलंबली आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेणे, कामांचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

नमो गार्डनच्या विकासापासून मराठा मंडळ परिसरातील गणेश सानाचे सुशोभीकरण, शहरातील रस्त्यांची कामे, विविध मूलभूत सुविधा आणि शासनाच्या योजनांमधून विकासकामांना गती देण्यासाठी संदेश पारकर व त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्न करत आहेत. विकास हा केवळ घोषणांमध्ये न राहता प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे, हा त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे.

पर्यावरण संवर्धनालाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले आहे. कणकवली अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित व्हावे, प्लास्टिकमुक्त शहर निर्माण व्हावे तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छता ही केवळ नगरपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश त्यांनी सातत्याने दिला.

युवक हे समाजाचे भवितव्य असल्याची भूमिका घेत त्यांनी तरुणांना सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यावर भर दिला आहे. क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, रोजगाराभिमुख उपक्रम आणि विविध जनजागृती मोहिमांमधून युवकांना संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे.

संदेश पारकर यांच्या राजकारणाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केला. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र शहराच्या हिताच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र आले पाहिजे, ही त्यांची भूमिका कायम राहिली आहे. सकारात्मक संवाद, समन्वय आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची त्यांची कार्यशैली त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवते.

भविष्यातील कणकवली अधिक आधुनिक, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सुविधायुक्त करण्याचे त्यांचे स्पष्ट नियोजन आहे. वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, सार्वजनिक सुविधांचा विस्तार, दर्जेदार नागरी सेवा, पर्यावरणपूरक विकास आणि दीर्घकालीन शहर नियोजन यावर त्यांचा विशेष भर आहे. कणकवलीच्या विकासाची ही वाटचाल अधिक वेगाने पुढे नेण्याचा त्यांचा निर्धार दिसून येतो.

जनतेशी असलेली नाळ, विकासाविषयीची बांधिलकी, समाजकारणाची जाणीव आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आत्मीयता या गुणांमुळे संदेश पारकर यांनी कणकवलीकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच आज अनेकांच्या तोंडी एकच भावना ऐकायला मिळते—”नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर… आणि कणकवलीचा लोकनायक म्हणूनही संदेश पारकर!”

नगराध्यक्ष संदेश पारकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शहर विकासाची नवी उंची गाठो, हीच सदिच्छा.

शेअर करा