न्यायालयाच्या आदेशानंतर कुडाळ पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल
कुडाळ,दि.०८ ऑगस्ट
कुडाळ शहरातील गणेशनगर परिसरात एका घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी तेजल जितेंद्रभाई पटेल (वय १९) आणि यश पारसिया (वय २७, रा. धावडा मोटा, ता. नखत्राणा, जि. कच्छ, गुजरात) यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जानुसार न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याप्रकरणी जितेंद्रभाई भीमजीभाई पटेल (वय ४५, रा. गणेश नगर, कुडाळ; मूळ रा. देवीशर, ता. नखत्राणा, जि. कच्छ, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास गणेशनगर येथील फिर्यादी यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख, सुमारे १.८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील बट (किंमत अंदाजे ४ हजार रुपये) आणि १२.४७० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत अंदाजे ४० हजार रुपये) असा एकूण सुमारे ९४ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार तेजल हिने आरोपी यश पारसिया याच्या संगनमताने व परस्पर सहाय्याने घरातील वरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल न झाल्याने फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. कुडाळ न्यायालयातील फौजदारी अर्ज क्रमांक १०/२०२६ वर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील चोरीचा मुद्देमाल अद्याप हस्तगत झालेला नसून तो निरंक असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सचिन गवस करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक अवताडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.