कुडाळ, दि. ०७ जुलै
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सरंबळ यांच्या संयुक्त विद्यमाने एनडीआरएफ जवानांच्या मार्फत ग्रामस्तरीय आपत्ती प्रशिक्षण कार्यक्रम सरंबळ हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी आमच्या विभागातील सर्व लोक आपत्ती काळात धैर्याने सामोरे जातात. यापूर्वी अनेकवेळा पूरस्थिती निर्माण झाली त्यावेळी गावातीलच काही लोकांनी जीवाची परवा न करता संकटात असलेल्या अनेक ग्रामस्थांना बाहेर काढले आहे याची आपण कौतुक करत असून या ठिकाणी आज पुणे येथून एनडीआरएफचे बटालियन ५ पुणे चे जवान या ठिकाणी प्रशिक्षण देण्यास आलेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. परंतु, शासनाने पावसाळा सुरू होण्याअगोदरच असे प्रशिक्षण आयोजित करणे अपेक्षित होते. या अनुषंगाने आपण मे महिन्यातच तहसीलदार यांना पत्र देऊन आपत्ती परिस्थितीच्या अनुषंगाने एक विभागाची बैठक लावण्यासंदर्भात कळविले होते. या ठिकाणचे सरंबळ, चेंदवण, कवठी, वालावल, पावशी इत्यादी गाव हे आपत्तीच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. त्यामुळे याआधीच असे प्रशिक्षण व उपाययोजना होणे अपेक्षित होते अशी खंत व्यक्त करत उपस्थित सर्वांनी हे प्रशिक्षण घेऊन गावातील ग्रामस्थांना याची माहिती देऊन एकमेकास पुरजन्य आपात्कालीन परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच एनडीआरएफ जवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी एनडीआरएफचे अधिकारी शर्मा, पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, दिप्ती नाईक, करुणा पावसकर, सरंबळ सरपंच रावजी कदम, उपसरपंच सागर परब, कवठी सरपंच स्वाती करलकर, वालावल उपसरपंच कासवकर तसेच विभागातील सर्व पोलिस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती अध्यक्ष, शिक्षक प्रतिनिधी व ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.