सावंतवाडी,दि.३ सप्टेंबर
पर्यावरणपूरक, स्वच्छ व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत “पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव रील्स स्पर्धा – २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत सामाजिक जबाबदारीचा संदेश देणे हा उद्देश आहे.
स्पर्धेतील समाविष्ट विषय:
पर्यावरणपूरक किंवा शाडू मातीच्या गणेशमूर्तीचा वापर, कृत्रिम कुंडामध्ये गणेशमूर्ती विसर्जन, प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव, ओला व सुका कचरा वर्गीकरण, निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन व त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती, ध्वनि व वायू प्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा करणे, पाणी बचत व जलसंवर्धन, तसेच “माझा गणेशोत्सव – माझी जबाबदारी” या संकल्पनेवर आधारित संदेश.
स्पर्धेचे स्वरूप व नियम:
पात्रता: स्पर्धा केवळ सावंतवाडी शहर मर्यादित व घरगुती गणेशोत्सवासाठी आहे. शहरातील सर्व नागरिक, युवक-युवती व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.
नियम: गणेशमूर्ती शाडू मातीची असणे बंधनकारक आहे. सजावटीसाठी थर्मोकॉल व सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा. सजावटीमध्ये पर्यावरण रक्षणाबद्दल किमान २ संदेश दिलेले असावेत.
रील्सचा कालावधी: रील्सची मुदत कमाल ६० सेकंद (किमान १ मिनिट) असावी. भाषा मराठी असावी.
सहभाग कसा नोंदवावा: तयार केलेली रील सोशल मीडियावर अपलोड करताना @sundarwadisawantwadi या सावंतवाडी नगरपरिषदेच्या अधिकृत खात्याला टॅग करणे आवश्यक आहे. सोबत #EcoGaneshotsav2026, #SawantwadiNagarparishad, आणि #पर्यावरणपूरकगणेशोत्सव2026 हे हॅशटॅग वापरावेत.
आकर्षक पारितोषिके:
प्रथम क्रमांक: ₹ ५,००० व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक: ₹ ३,००० व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक: ₹ २,००० व सन्मानचिन्ह
सावंतवाडी नगरपरिषदेच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर स्पर्धेचे सविस्तर नियम प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या पर्यावरणपूरक उपक्रमात शहरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ श्रद्धा सावंत भोसले, उपनगराध्यक्ष अँड अनील निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, सर्व सभापती व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.