कुडाळ पोलिसांची जलद कारवाई; अवघ्या 12 तासांत तपास पूर्ण, आरोपीस न्यायालयाकडून शिक्षा.

शेअर करा

कुडाळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांनी केली कारवाई.

कुडाळ,दि.१५ जून

कुडाळ पोलीस ठाण्याने दाखल झालेल्या वाहतूक नियमभंग व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रकरणात अवघ्या 12 तासांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुडाळ न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 215/2026 अन्वये दाखल करण्यात आलेल्या समरी केस क्रमांक 292/2026 चा निकाल आज 15 जून 2026 रोजी लागला. सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 281 व 324 अन्वये दाखल करण्यात आला होता.

प्रकरणातील आरोपी राजेंद्र कुमार नरपाल सिंग (वय 27 वर्षे रा. काशी, रामपूर पोस्ट नागल, जि. बीजनौर, उत्तर प्रदेश) याने दि. 15 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 1.32 वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक MH 17 CV 9450 हे वाहन भरधाव वेगाने, अविचाराने व निष्काळजीपणे चालविले. वाहन चालविताना रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने कंटेनरने रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवरील दगडांना जोरदार धडक दिली. या अपघातात डिव्हायडरचे नुकसान झाले असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस नाईक राजू प्रभाकर दळवी (PN 262), कुडाळ पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली होती. गुन्ह्याचा तपास HC 256 गवस यांनी अत्यंत तत्परतेने पूर्ण केला. अवघ्या 12 तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सदर प्रकरणाची सुनावणी मा. श्री. जी. ए. कुलकर्णी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC), कुडाळ यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत BNS कलम 281 अंतर्गत ₹1,000 दंड, दंड न भरल्यास 5 दिवस साधी कैद, तसेच BNS कलम 324 अंतर्गत ₹15,000 दंड, दंड न भरल्यास 20 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

या जलद तपासामुळे आणि तत्पर न्यायप्रक्रियेमुळे कुडाळ पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

शेअर करा