सिंधुदुर्गातील कर्मचारीही आंदोलनात सहभागी होणार; पिण्याच्या पाण्याच्या नमुना तपासणीवर परिणाम होण्याची शक्यता
कुडाळ,दि.०८ ऑगस्ट
राज्यातील पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळांमधील कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यांपासूनचे वेतन थकीत असल्याने या कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार निवेदने देऊनही शासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी अखेर १३ ऑगस्टपासून राज्यव्यापी ‘कामबंद’ आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी होणार असून पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी ठप्प होण्याची शक्यता आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अंतर्गत राज्यातील १७६ पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळांमध्ये सुमारे ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. सदर कर्मचारी मागील १२-१३ वर्षांपासून अतिआवश्यक सेवा देत आहेत. पाण्याची गुणवत्ता तपासून जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे.म्हणून सेवा देत आहेत आणि जनतेचे आरोग्य निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या पाणी तपासणी प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे एप्रिलपासून सुमारे ५ ते ६ कोटी रुपये वेतन थकीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अनेकदा निवेदने देऊनही शासनाने दखल घेतली नसल्याने कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात संघटनेने घेतला आहे.
प्रयोगशाळांमध्ये ३४० पदे रिक्त असून ती तातडीने भरावीत, तालुकास्तरावरील भाडेतत्त्वावरील प्रयोगशाळा शासकीय जागेत सुरू कराव्यात, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, ११ महिन्यांच्या नियुक्तीचे आदेश द्यावेत, मानधनात ५० टक्के वाढ करावी, बदली धोरण लागू करावे, प्रयोगशाळांसाठी स्वतंत्र संचालक नेमावा, कंत्राटी नियुक्ती रद्द करावी, अतिजोखमीच्या कामासाठी सुरक्षा द्यावी तसेच महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची प्रसूती रजा द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
थकीत वेतन तसेच अन्य मागणीबाबत वारंवार निवेदने देऊनही शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. आंदोलनाला उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासनच जबाबदार राहील. तसेच १२ ऑगस्टपर्यंत वेतन मिळाले नाही तसेच अन्य मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास १३ ऑगस्टपासून पुणे-शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या कार्यालयासमोर
राज्यातील काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासनच जबाबदार राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
पाणी तपासणी काम ठप्प होणार
पावसाळ्याचे दिवस असल्याने या काळात पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेची व गुणवत्तेची तपासणी अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे प्रयोगशाळांमधील पाणी तपासणीचे काम पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
बॉक्स :
सिंधुदुर्गातील कर्मचारी होणार आंदोलनात सहभागी
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा स्तरावर एक आणि उपविभाग स्तरावर ३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. यात १८ पदे मंजूर असुन त्यापैकी ७ पदे भरलेली आहेत. त्यांच्यामार्फत पाणी नमुने अनुजैविक व रासायनिक तपासणी पार पाडली जात आहे. या राज्यव्यापी आंदोलनात या जिह्यातील कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेअंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेले कर्मचारी सत्यव्रत पाटकर यांनी दिली.