कुडाळ : एक वर्षापासून फरार असलेला पाहिजे आरोपी मुंबईत जेरबंद

शेअर करा

कुडाळ पोलिसांच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

कुडाळ,दि.१० ऑगस्ट

कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात गेल्या सुमारे वर्षभरापासून पोलिसांच्या नजरेआड असलेल्या पाहिजे आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून ताब्यात घेतले.

कुडाळ पोलीस ठाण्यात दिनांक २४ मार्च २०२५ रोजी गुन्हा अन्वये भादंवि कलम ४२०, ४०६ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत सुरू होता.

या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जेम्स गॅब्रियल ब्रिटो (वय ३५, रा. उभादांडा, वेंगुर्ला) हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना चकवा देत फरार होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथील केव्हीणीपाडा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने परिसरात शोधमोहीम राबवली. त्यावेळी ९ ऑगस्ट २०२६ रोजी दत्तमंदिराजवळ, केव्हीणीपाडा, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई येथे आरोपी जेम्स गॅब्रियल ब्रिटो याला ताब्यात घेण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी त्याला कुडाळ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, ASI सदानंद राणे, पोलीस हवालदार जॅकसन घोंसाल्विस, राजेंद्र गोसावी तसेच पोलीस शिपाई महेश समजिस्कर व अमर कांडर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

शेअर करा