मालवण: कट्टा महाविद्यालयात करिअर संसदेचा शपथविधी; विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व व लोकशाही मूल्यांचा जागर

शेअर करा

नवनिर्वाचित विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न; करिअर कट्टा उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाची नवी संधी

मालवण,दि.०१ ऑगस्ट

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे करिअर कट्टा विभागांतर्गत करिअर संसदेचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजयराज वराडकर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात करिअर संसदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांत सहभागी होऊन स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.

यावेळी नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी मंत्रिमंडळाला शपथ देण्यात आली. मुख्यमंत्रीपदी कु. संचिता मंगेश करावडे यांची निवड करण्यात आली असून विविध विभागांसाठी इतर विद्यार्थ्यांनाही मंत्रिपदे देण्यात आली. शपथविधीनंतर सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, उपप्राचार्य रविंद्र गावडे, प्रा. वैशाली पालव, करिअर कट्टा समन्वयक प्रा. कांचन खानोलकर तसेच प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा या व्यासपीठाचा प्रभावी वापर करून आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी, असे आवाहन केले. उपप्राचार्य रविंद्र गावडे यांनी करिअर कट्टा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती कुंभार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. कांचन खानोलकर यांनी मानले.

शेअर करा