यू डायस प्रमाणे पुस्तके दिली म्हणून सांगणाऱ्या प्रशासनाने शाळांना पुस्तके दिली कमी
आमदार निलेश राणे यांनी लक्ष घालण्याची मागणी
मालवण,दि.१७ जून
नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होऊन तीन दिवस उलटले तरी मालवण तालुक्यात शासनाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पाठ्यपुस्तके वितरणात सावळा गोंधळ सुरु असून अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहिले आहेत. इयत्ता सहावीचा अभ्यासक्रम बदलला असताना काही शाळांमध्ये सहावीची चार विषयांचीच पुस्तके वितरित झाली आहेत तर काही शाळांमध्ये सहावीची पुस्तकेच विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. तसेच इयत्ता पाचवी, सातवी व आठवीची पुस्तकेही अनेक विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. याबाबत प्रशासन वा शिक्षण विभाग तालुक्यात “एकात्मिक जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली” (यु डायस )प्रमाणे केंद्रप्रमुखांकडे पुस्तके वितरित करण्यात आल्याचे सांगून हात वर करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके न मिळाल्याने विद्यार्थ्यांना पुस्तकाविना शाळेत जावे लागत असून या कामी आमदार निलेश राणे यांनी लक्ष घालण्याची मागणी पालकांमधून होत आहे
दि. १५ जून पासून शाळा सुरु झाल्या आहेत. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना पाठपुस्तके देण्यात येतील असे शासनाने जाहीर केले होते. मात्र या पाठपुस्तक वितरणात मालवण तालुक्यात सावळा गोंधळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी इयत्ता सहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. असे असताना मालवण तालुक्यातील काही शाळांमध्ये सहावीची केवळ चार विषयांची पुस्तकेच वितरित करण्यात आली आहेत. तर काही शाळांमध्ये सहावीच्या एकाही विषयाचे पुस्तक विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. तसेच जुन्या अभ्यासक्रमाची इयत्ता पाचवी, सातवी, आठवीचीही पुस्तके काही शाळांमध्ये मिळालेली नाही. शाळा सुरु होऊन तीन दिवस झाले तरी तालुक्यात अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहिल्याने अभ्यास कसा करायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर निर्माण झाला आहे.
याबाबत प्रशासन वा शिक्षण विभाग यु डायस प्रमाणे प्रत्येक शाळेसाठी त्या त्या केंद्रप्रमुखांकडे पुस्तके वितरित करण्यात आल्याचे सांगून हात वर करत आहे. पुस्तके वितरित झाली तर ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली कां नाही असा सवाल पालकांमधून विचारला जात आहे. तसेच शहरातील मोठ्या शाळांमध्ये इतर गावातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाने यु डायस प्रमाणे पुस्तके न देता शाळेतील हजेरी पटावरील संख्येनुसार पुस्तके वितरित करावीत अशी मागणी केली जात आहे.
शासनाच्या समग्र शिक्षा अभियानात दरवर्षी गोंधळ दिसून येतो, मात्र यावर्षी मालवण तालुक्यात मोठा गोंधळ उडल्याचे चित्र आहे. पुस्तक वितरणातील या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून याबाबत पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे याबाबत तालुक्यातील काही पालक आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे समजते.