मालवण,दि.१८ ऑक्टोंबर
साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीतील सर्जनशीलतेला आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे, तसेच युवकांमध्ये वाचन, लेखन आणि साहित्य-संस्कृतीविषयी आस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कथा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते ४० वयोगटातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा लेखकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कथा लेखन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युवकांनी २००० ते २५०० शब्दांची कथा सादर करायची आहे. कथा पूर्णपणे स्वनिर्मित आणि स्वलिखित असणे आवश्यक असून यापूर्वी ती कुठेही प्रकाशित झालेली नसावी. कथा लेखनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) किंवा तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करता येणार नाही.
कथा सुवाच्य हस्ताक्षरात किंवा टाईप केलेली असावी. कथेसोबत सहभागीचे पूर्ण नाव, वय, पत्ता आणि संपर्क क्रमांक स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. प्रत्येक सहभागीला केवळ एकच कथा पाठविता येईल. स्पर्धेसाठी कथा ३० ऑक्टोबर पर्यंत कार्यवाह, बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण, जि. सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवायची आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी ४५०० रु. रोख आणि ५०० रु. किमतीची पुस्तके, द्वितीय क्रमांकासाठी २५०० रु. रोख आणि ५०० रु. किमतीची पुस्तके), तर तृतीय क्रमांकासाठी १५०० रुपये रोख आणि ५०० रु. किमतीची पुस्तके अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्यांना २९ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनात मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते प्रत्यक्ष बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना २९ नोव्हेंबर रोजी संमेलनस्थळी सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. सुमेधा नाईक – 9404924678 यांच्याशी संपर्क साधावा. सिंधुदुर्गच्या युवा लेखकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने करण्यात आले आहे.