मालवण,दि.०२ जुलै
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत सुरू असलेल्या फॉर्म भरण्याच्या कामासाठी मालवण तालुक्यातील जास्त मतदारसंख्या असलेल्या मतदान केंद्रांवरील बी एल ओ यांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजपचे चिंदर येथील पंचायत समिती सदस्य तथा गटनेते दीपक सुर्वे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आह
सध्या राज्यभर प्रत्येक गावात मतदारांचे SIR फॉर्म भरण्याचे काम वेगाने सुरू असून, हे फॉर्म सादर करण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र मालवण तालुक्यात कमी व जास्त मतदारसंख्या असलेल्या सर्व बी एल ओ यांना समान कालावधी देण्यात आल्याने अधिक मतदारसंख्या असलेल्या केंद्रांवरील बी एल ओ यांच्या वर कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे.
विशेषतः ५०० हून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांवरील बी एल ओ यांना दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करणे कठीण होत असल्याने, त्यांना मदतीसाठी गावातील पोलीस पाटील किंवा महसूल विभागातील इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे लेखी आदेश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागणीमुळे SIR अभियान अधिक प्रभावीपणे व मुदतीत पूर्ण होण्यास मदत होईल, तसेच मतदारांना कोणतीही गैरसोय होणार नाही, असा विश्वास दीपक सुर्वे यांनी व्यक्त केला आहे.