ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल गाड यांचे प्रतिपादन;
भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात
मालवण,दि.१५ ऑक्टोंबर
“कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचनामुळे आपल्या कल्पनाशक्तीला नवनवे कंगोरे फुटतात. लेखक किंवा साहित्यिक व्हायचे असेल, तर पुस्तके वाचली पाहिजेत. आपण काहीतरी साध्य करायचे, असे निश्चित करून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले, तर निश्चितच यश मिळवता येते. पुस्तकांमधून प्रेरणा मिळते. त्यामुळे वाचन करा, लिखाण करा आणि साहित्यनिर्मितीसाठी योग्य विषय निवडून त्याचा सखोल अभ्यास करा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व कवी डॉ. विठ्ठल गाड यांनी येथे बोलताना केले.

भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे कमिटी मेंबर यश केरकर, कॉन्सिल सदस्य रामदास मयेकर, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्याध्यापक आर डी बनसोडे, सहाय्यक शिक्षिका सौ संजना सारंग, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी व इतर उपस्थित होते
प्रारंभी मुख्याध्यापक आर डी बनसोडे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले तर सौ सारंग यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला
यावेळी बोलताना डॉ. विठ्ठल गाड यांनी वाचन आणि लेखन यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. साहित्य निर्मितीसाठी केवळ शब्दांचे ज्ञान पुरेसे नसून, विषयाचा अभ्यास, निरीक्षण, चिंतन आणि सातत्यपूर्ण वाचन आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले,
“शब्दांच्या मागे धावता, तेव्हा शब्द तुमच्याकडे येतात. ते तुमच्या जवळ येतात, तुमचे मित्र बनतात आणि त्यातूनच साहित्याचा जन्म होतो,” या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना लेखनाची प्रेरणा दिली. आपल्या मनातील कल्पनांना शब्दरूप देण्यासाठी वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश केरकर यांनी आजच्या डिजिटल युगात वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. मोबाईलच्या अतिवापरामुळे पुस्तकांपासून दूर जाण्याची प्रवृत्ती वाढत असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासावर आणि संवाद कौशल्यावर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचनामुळे शब्दसंपदा वाढते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी दररोज काही वेळ पुस्तकांसाठी देऊन वाचनाची सवय लावून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कथाकथन, निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली त्याचे पारितोषिक वितरण पार पडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रफुल्ल देसाई यांनी केले शेवटी शिक्षिका सौ अस्मिता वाईरकर यांनी आभार मानले