स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; सागरी परिसंस्था, कासव संवर्धन व कांदळवन संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मालवण,दि.१८ ऑक्टोंबर
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय व वन विभाग कांदळवन कक्ष मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव संवर्धन आणि जनजागृतीपर विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात तज्ज्ञांच्या उपस्थितीत सागरी परिसंस्था, कासव संवर्धन, कांदळवनांचे रक्षण आणि वन्यजीव संरक्षण कायदा या विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रा. राबते यांनी प्रास्ताविक करत वन्यजीवांचे रक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी वन विभागाच्या प्रकल्प समन्वयक वेदिका चव्हाण यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कासव संवर्धनावर विस्तृत माहिती देत कासव संवर्धन मोहिमेत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी आवाहन केले. प्राजक्ता पाटील यांनी ‘वन्यजीव संरक्षण कायदा’ या विषयावर विद्यार्थ्यांना कायदेशीर तरतुदींची सविस्तर माहिती देत वन्यजीव संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले. मोहिनी भिंगारे यांनी किनारपट्टीवरील कांदळवनांचे (खारफुटी) पर्यावरणीय महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मत्स्य विभागाचे प्रकल्प समन्वयक दीपक जाधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा बर्वे यांनी केले, तर आभार प्रा. हसन खान यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा.अन्वेषा कदम, प्राध्यापिका प्रांजल परुळेकर आणि प्रा. हर्षदा धामापूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.