मसुरे ,दि.१७ जून
मालवण तालुक्यातील आडवली घाडीवाडी येथील रहिवासी श्रीमती सुशीला कृष्णा घाडीगावकर (वय ८० वर्ष) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्याने घाडीवाडी परिसरात आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या आपल्या मनमिळावू, कष्टाळू आणि अत्यंत प्रेमळ स्वभावासाठी संपूर्ण परिसरात परिचीत होत्या.
श्रीमती सुशीला घाडीगावकर यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे. पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता, त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रचंड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा गाडा सांभाळला. सर्व मुलांवर चांगले संस्कार करत त्यांनी कुटुंबाला एकसंध ठेवले आणि जीवनात मानाचे स्थान मिळवून दिले.
कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्याकडे मोठा ओढा होता. गावात किंवा परिसरात होणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच हिरीरीने सहभाग असायचा.
आडवली समर्थगड येथील प्रसिद्ध ‘अष्टगणकोट श्री स्वामी समर्थ मठाच्या’ बांधकाम उभारणीत ज्यांचे मोलाचे योगदान आहे, ते प्रगतशील शेतकरी तथा बांधकाम व्यावसायिक रमेश घाडीगावकर यांच्या त्या मातोश्री होत.
सुशीला घाडीगावकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच आडवली समर्थगड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष सुनील घाडीगावकर (भाई महाराज) तसेच मठातील सर्व सेवेकऱ्यांनी घाडीगावकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. एक मातृछत्र हरपल्याची भावना समर्थगड परिवाराकडून व्यक्त करण्यात आली आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, जावई, सून, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा आणि सुविद्य परिवार आहे.