नाशिकमध्ये दयानंद मांगले यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली; देवदर्शन यात्रेत भावनांचा बांध फुटला…

शेअर करा

साई ट्रॅव्हल्सच्या यात्रेदरम्यान ज्येष्ठ पत्रकारांच्या निधनाची बातमी कानी पडताच यात्रेकरू झाले स्तब्ध; “हसतमुख चेहरा हरपला” अशा शब्दांत व्यक्त केल्या भावना

नाशिक,दि.१४ जुलै

देवगड साई ट्रॅव्हल्स आयोजित उज्जैन–ओंकारेश्वर–इंदोर–शिर्डी–नाशिक देवदर्शन यात्रेदरम्यान ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांच्या निधनाची दुःखद बातमी समजताच संपूर्ण यात्रेवर शोककळा पसरली. काही क्षणांपूर्वी भक्तीमय वातावरणात रंगलेले यात्रेकरू ही बातमी ऐकताच सुन्न झाले. प्रत्येकाच्या ओठांवर एकच वाक्य होते – “आपल्याला कायम हसवणारा, आपुलकीने जोडणारा चेहरा आज कायमचा हरपला.”

या दुःखद प्रसंगी १३ जुलै रोजी नाशिक येथे साई ट्रॅव्हल्सच्या देवदर्शन यात्रा परिवाराच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या आणि वातावरण अक्षरशः गहिवरून गेले.

यावेळी पत्रकार गणेश आचरेकर बोलताना म्हणाले, “दया वयाने माझ्यापेक्षा मोठा असला तरी मी त्याला कायम ‘दया’ असंच म्हणायचो. त्या एका शब्दात मैत्रीपेक्षा मोठ्या भावाचं नातं होतं. गेली अनेक वर्षे आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं. आमच्या मैत्रीत कधीही कटुता आली नाही. अनेकांनी आमच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण दयाने नेहमीच ठामपणे सांगितलं – ‘जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत आपल्या मैत्रीला कोणताही तडा जाणार नाही.’ आज तो शब्द आठवतो आणि मन हेलावून जातं. अखेर परमेश्वराचीच नजर या मैत्रीला लागली, अशी भावना मनात दाटून येते.”

साई ट्रॅव्हल्सचे मालक तथा नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “पप्पांच्या निधनानंतर दया काकांचे मार्गदर्शन मला नेहमी लाभले. देवदर्शन यात्रेच्या प्रत्येक नियोजनात त्यांचा मोलाचा वाटा असायचा. त्यांच्या अनुभवाचा आणि प्रेमाचा आम्हाला मोठा आधार होता. दया काकांसारखं व्यक्तिमत्त्व पुन्हा होणं अशक्य आहे. आज या यात्रेतील एक प्रमुख तारा निखळला असला, तरी त्यांच्या आठवणी कायम आमच्या सोबत राहतील.”

शिवराम निकम यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सांगितले, “लहानपणी दयाचा शाळेकडे फारसा ओढा नव्हता. त्याला अनेकदा आग्रहाने शाळेत घेऊन जावं लागायचं. पण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि पत्रकारितेत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. त्याच्या जाण्याने आम्ही एक जीवाभावाचा मित्र गमावला आहे.”

यावेळी उपस्थितांनी दयानंद मांगले यांच्या पत्रकारितेतील योगदानाचाही गौरव केला. “मांगले सर म्हणजे चालतं-बोलतं पत्रकारितेचं विद्यापीठ होतं. साई ट्रॅव्हल्समुळे आमची ओळख झाली, पण त्यांनी कधीही आम्हाला परकं मानलं नाही. आम्ही राजकारणात असलो तरी राजकीय जीवनात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेले अनेक कानमंत्र त्यांनी वेळोवेळी दिले. त्यांच्यासारखा मार्गदर्शक पुन्हा होणे कठीण आहे,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

श्रद्धांजली सभेदरम्यान अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आठवणींच्या ओघात अनेकांना शब्दही फुटत नव्हते. भक्तीच्या यात्रेत दुःखाची ही बातमी सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.

सभेच्या शेवटी उपस्थितांनी एकच निर्धार व्यक्त केला – “दया आज आपल्यात नसला, तरी त्याचा आनंदी, हसतमुख आणि माणसं जोडणारा स्वभाव आपण आपल्या आयुष्यात जपला, तर तीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल.”

शेअर करा