फोंडाघाट,दि.०६ ऑगस्ट (संजय सावंत )
कणकवली तालुक्यातील कोळोशी/फोंडाघाट ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असणारे मंगेश राणे यांना तेथील प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्याबद्दल त्यांच्या कार्यतत्परतेची,प्रामाणिक सेवाभावाची आणि ग्रामीण विकासासाठीच्या योगदानाची दखल घेत राज्य शासनाने त्यांना सन २०२४-२५ चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर केला आहे.
राज्य शासनाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याने कणकवली तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मंगेश राणे हे सध्या कोळोशी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असून फोंडाघाट ग्रामपंचायत चा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत.
बीएस्सी फॉरेस्ट्री चे उच्चशिक्षण घेतल्यानंतर मंगेश राणे यांनी ग्रामसेवक म्हणून आपल्या शासकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या 22 वर्षांच्या सेवाकाळात विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्य करताना पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. कणकवली तालुक्यातील जानवली आणि फोंडाघाट ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी ग्रामविकास, स्वच्छता, प्रशासनातील शिस्त, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नागरिकांना तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले होते. त्यांच्या कामामुळे संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांना गती मिळाली आणि प्रशासनाबाबत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
प्रशासकीय कामकाजाबरोबरच मंगेश राणे यांनी संघटनात्मक स्तरावरही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. ग्रामसेवक संघटनेमध्ये त्यांनी तालुका सचिव तसेच जिल्हा सहसचिव म्हणून कार्य करत असताना ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविला. संघटनात्मक कार्यातही त्यांनी समन्वय आणि नेतृत्वगुणांचे उत्कृष्ट दर्शन घडविले आहे
दरम्यान त्याना मिळालेल्या या पुरस्कारामुळे कणकवली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक तसेच नागरिकांकडून मंगेश राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण विकासासाठी समर्पित सेवाभाव, उत्कृष्ट प्रशासन आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर झालेली ही गौरवपूर्ण दखल असल्याची भावना व्यक्त होत आहे.