सावंतवाडी,दि.२४ मे
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे “महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव : असंघटीत लोककलावंतांचा महोत्सव” या तीन दिवसीय विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, कला आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात राज्यातील विविध भागांतून सुमारे १५० लोककलावंत सहभागी झाले असून, पारंपरिक कलाप्रकारांचे सादरीकरण रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे.
महोत्सवाच्या शनिवारी झालेल्या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडीतील ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. ॲड. अरुण पणदूरकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, मोहन जाधव, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे आणि आर्यन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे व कलावंतांचे स्वागत करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सावंतवाडी येथील मिलाग्रीस प्रशालेची दहावीतील १०० टक्के गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी भार्गवी अंकुश शेटवे हिचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच इन्सुली येथील श्री. व सौ. राणे दांपत्याचा, स्वाध्याय परिवाराचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल गौरव करण्यात आला.
शनिवारी महोत्सवात खेळ कळसूत्री बाहुल्यांचा, कोळी नृत्य, मयूर नृत्य, फुगडी आणि झिम्मा, गोंधळ तसेच छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक या दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले, तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगली येथील सुप्रसिद्ध निवेदक संतोष जाधव यांनी केले.
शनिवारच्या कार्यक्रमांना सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.