गेल्या सात-आठ दिवसांपासून एकाच ठिकाणी होता गवा; पायांना जंतू पडल्याने चालणे झाले होते कठीण
सावंतवाडी,दि.२४ ऑक्टोंबर
कोंडुरे येथे आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुमारे १२ वर्षांचा गवा मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे मोबाईल स्कॉड घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी वनपाल विजय दाते, वनरक्षक प्रकाश रानगिरे तसेच रेस्क्यू टीमचे बबन रेडकर, शुभम फाटक, देवेंद्र परब आणि नितीन सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर गवा गेल्या सात ते आठ दिवसांपासून एकाच ठिकाणी होता. त्याच्या पायांना जंतू पडल्याने त्याला चालता येत नव्हते, अशी माहिती मिळाली.
मळेवाड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनाद बाळगी यांनी मृत गव्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वनविभागाच्या उपस्थितीत नियमानुसार मृत गव्याला दफन करण्यात आले. यावेळी मृत गव्याचा पंचनामा करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनाद बाळगी यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, गव्याचा मृत्यू लाग रोगामुळे (संसर्गजन्य आजारामुळे) झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
या कार्यवाहीदरम्यान बापू मुळीक, सुधीर मुळीक आणि प्रितेश मुळीक व ग्रामस्थांनी सहकार्य केले.