सावंतवाडी,दि.१४ जुलै
देवगड येथील ‘दैनिक रत्नागिरी टाइम्स’चे प्रतिनिधी आणि ‘ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल’चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दयानंद मांगले यांचे अकाली निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. “दया” चे जाण्याचे हे वय नक्कीच नव्हते. गंभीर आजारपणाशी झुंज देत, पुन्हा उभे राहण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि देवानेही साथ दिली नाही. त्यांच्या जाण्याने देवगड तालुक्याचा एक दांडगा अनुभव असलेला, जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडलेला आणि पत्रकारितेसोबतच सामाजिक-शैक्षणिक क्षेत्राची जाण असलेला उमदा नेता व मित्र आपण गमावला आहे.
अभ्यासू आणि संवेदनशील पत्रकार
दयानंद मांगले केवळ बातम्या लिहिणारे पत्रकार नव्हते, तर त्या बातमीमागच्या माणसाचे दुःख समजून घेणारे संवेदनशील संवेदनशील कार्यकर्ते होते. सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता अशा प्रत्येक क्षेत्रात दया हिररीने काम करत असे. प्रत्येक विषयाचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. शासकीय योजना असोत, महसूल विभागाचे किचकट नियम असोत की सर्वसामान्यांचे प्रश्न, दया यांच्याकडे प्रत्येक गोष्टीची अचूक माहिती असायची.
मुंबईत राहणारे देवगड तालुक्यातील चाकरमानी जेव्हा त्यांच्या भागातील महसूल, पाणीपुरवठा किंवा इतर नागरी अडचणींबाबत फोन करायचे, तेव्हा अनेकदा मी स्वतः दया यांच्याशी संपर्क साधायचा. “अरे दया, हा प्रश्न आहे, जरा बघ ना…” एवढे सांगितले की काम झालेच म्हणून समजा. दया कधीही त्या प्रश्नाकडे पाठ फिरवायचा नाही. तो प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः प्रशासनाकडे पाठपुरावा करायचा. त्यांच्या या कामाच्या पद्धतीमुळे देवगड तालुक्यात त्यांचा जनसंपर्क आणि कामाचा अनुभव दांडगा होता. असा हा हक्काचा मार्गदर्शक आणि पाठीशी उभा राहणारा मित्र आज आपल्यात नाही, हे दुःख खरोखरच मन हेलावून टाकणारे आहे.
गर्वाचा लवलेश नसलेले अजातशत्रू व्यक्तिमत्त्व:
दया कुठेही भेटला, तरी त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक निखळ हास्य असायचे. समोरच्याला आदराने आणि आपलेपणाने बोलणे हा त्याचा स्थायीभाव होता. कोणत्याही प्रश्नावर त्याने कधी उडवाउडवीचे उत्तर दिले किंवा चिडून बोलले, असे कधीच पाहायला मिळाले नाही.
त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना ‘ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल’ या पत्रकार संघटनेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार, तसेच ‘जिल्हा पत्रकार संघा’चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. ते ‘ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल’चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. एवढे मानाचे पद आणि पुरस्कार मिळूनही दया यांच्यात कधीही अहंकाराचा किंवा पदाचा गवागवा करण्याचा स्वभाव नव्हता. ते शेवटपर्यंत जमिनीवर पाय असलेले आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे एक साधे-सरळ व्यक्तिमत्त्व राहिले.
शेवटच्या क्षणांतील ती अपूर्ण राहिलेली भेट
दया यांची तब्येत ठीक नसल्याचे समजताच मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. फोनवर बोलताना त्यांची विचारपूस केली, तेव्हा त्यांच्याशी आहार आणि आरोग्याबाबत बरीच चर्चा झाली. त्यांना संतुलित आहाराची गरज असल्याचेही बोलण्यातून समोर आले होते. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. नंतरच्या काळात एकदा मी त्यांना फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. मनात पाल चुकचुकली म्हणून मी लगेच गणेश आचरेकर यांना संपर्क साधला. तेव्हा गणेश हे दया यांच्या उपचाराच्या आणि हॉस्पिटलच्या धावपळीत व्यस्त असल्याचे समजले. दया लवकर बरे होऊन पुन्हा आपल्यात येतील, अशी आशा होती; मात्र ती आशा फोल ठरली.
एक न भरून निघणारी पोकळी:
एक अभ्यासू, दिलदार आणि संकटाच्या वेळी धावून जाणारा हक्काचा मित्र दयानंद मांगले यांच्या अचानक जाण्याने देवगडच्या सार्वजनिक जीवनात एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
माझा हा दिलदार मित्र आज आपल्यात नसला, तरी त्यांनी केलेल्या सामाजिक कामांच्या आणि पत्रकारितेच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. दयानंद मांगले यांच्या मृत आत्म्याला चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी भावपूर्ण प्रार्थना!
- भावपूर्ण आदरांजली! ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे (सावंतवाडी)