​सावंतवाडी : कोयत्याने वार करून दुखापत केल्याच्या आरोपातून सावंतवाडी कोर्टाकडून आरोपीची निर्दोष मुक्तता

शेअर करा

सावंतवाडी,दि.७ जुलै
कोयत्याने वार करून फिर्यादीला दुखापत करणे, शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोपातून आरोपी सागर आबा साळुंखे याची सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे अ‍ॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अ‍ॅड. गणेश चव्हाण, अ‍ॅड. दत्तप्रसाद ठाकूर, अ‍ॅड. केतन जाधव, अ‍ॅड. वामन गवस यांनी काम पाहिले.


​याबाबत सविस्तर वृत्त असे की, १० जुलै २०२२ रोजी सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या गाडीची चार्जिंगला दिलेली बॅटरी आणण्याकरिता गेले होते. चार्जिंग झालेली बॅटरी दुकानदारकडून घेऊन फिर्यादी आपल्या स्कूटरवर बसून घरी येण्यास निघत असताना, आरोपीने पाठीमागून हातात कोयता घेऊन त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ व डाव्या मांडीवर वार केले. त्यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्या जवळील बोटाला दुखापत झाली होती. हा प्रकार पाहून दुकानदाराने धावत येत आरोपीच्या हातातील कोयता काढून घेतला होता. यानंतर आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत “तू आता वाचलास, पुन्हा मला भेट, मी तुला संपवणार” अशी धमकी दिली होती. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


​हे प्रकरण सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालले. खटल्यादरम्यान कोर्टाकडून एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, फिर्यादीने दिलेली फिर्याद आणि साक्षीदारांनी दिलेले जबाब यांच्यात मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळून आली. त्यामुळे कोयत्याने वार करून दुखापत केल्याप्रकरणी आणि शिवीगाळ-धमकी दिल्याप्रकरणी प्रथमदर्शनी केस शाबीत होऊ शकली नाही. सबळ पुराव्यांचा अभाव आणि आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सागर आबा साळुंखे याची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

शेअर करा