सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
सावंतवाडी,दि.०९ ऑगस्ट
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत सावंतवाडी पोलिसांनी आरोंदा चेकपोस्टवर बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. या कारवाईत १,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरोंदा चेकपोस्ट (ता. सावंतवाडी) येथे पोलीस कारवाईदरम्यान आरोपी रत्नाकर नाईक हा एका कापडी पिशवीतून बिगरपरवाना बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना रंगेहात पकडला गेला.
आरोंदा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस संदीप झेंडे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार कदम यांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरवारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.