श्री देव वेतोबा मंदिरात ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक; कोणत्याही परिस्थितीत प्रस्तावित मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही, असा एकमुखी निर्णय
सावंतवाडी,दि.१७ जून
आजगाव येथील प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाविरोधात आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काल, मंगळवार १६ रोजी श्री देव वेतोबा मंदिरात ग्रामस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि आजगाव दशक्रोशीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत गावात मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही आणि यासाठी कायदेशीर व अहिंसेच्या मार्गाने तीव्र लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी गावात मायनिंय कंपनीच्या पथकाकडून मायनिंगसाठी अनधिकृतपणे ड्रोन सर्व्हे सुरू होता. गावाची कोणतीही पूर्वपरवानगी नसताना हा सर्व्हे सुरू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी कंपनीच्या पथकाला धारेवर धरले होते. ग्रामस्थांनी या पथकाला थेट श्री वेतोबा मंदिरात आणून जाब विचारला होता. गावाची परवानगी नसताना हा सर्व्हे सुरू केल्याने त्यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले होते.
या सर्व्हे प्रकरणावरून काही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.प्रशासनाच्या या दडपशाहीचा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. गावात मायनिंगसारख्या प्रकल्पांना पूर्ण विरोध असताना हे प्रकल्प स्थानिक जनतेच्या माथी मारण्याचं गौडबंगाल काय आणि यामागील मुख्य सूत्रधार कोण, असे अनेक रोकडे प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आले. तसेच, ग्रामस्थांवर करण्यात आलेले सर्व आरोप आणि दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली.
बैठकीत बोलताना काही ग्रामस्थांनी आपली तीव्र नाराजी आणि भावना व्यक्त केल्या. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो, असे सांगत येथील शेतकरी आणि ग्रामस्थ मेहनत करून, शेती-बागायती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात याकडे लक्ष वेधले. आमच्या पूर्वजांनी या जमिनी मोठ्या मेहनतीने जपल्या, घाम गाळून येथे निसर्ग टिकवून ठेवला आहे. जर आज या जमिनी मायनिंगसारख्या विनाशकारी प्रकल्पांना विकल्या, तर आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय सांगणार, असा भावनिक आणि तितकाच आक्रमक सवाल ग्रामस्थांनी केला. सध्या सुरू असलेल्या शासकीय दडपशाहीचा मुकाबला करत, हा निसर्गरम्य परिसर भकास होऊ न देण्यासाठी शेवटपर्यंत एकत्रित लढा लढण्याचा विडा ग्रामस्थांनी उचलला आहे.
या बैठकीदरम्यान राजकीय नेत्यांनीही हजेरी लावत आपली भूमिका मांडली आणि मार्गदर्शन केले. शिवसेनेचे संजू परब यांनी येथील ग्रामस्थांची भेट घेऊन, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे पूर्णपणे ग्रामस्थांच्या बाजूने असल्याचे सांगितले. तर भाजपचे महेश सारंग यांनी बोलताना सांगितले की, ग्रामस्थांना जर गावात मायनिंग प्रकल्प नको असेल, तर तो आपण होऊ देणार नाही आणि आपण ग्रामस्थांच्या बाजूने आहोत, असा निरोप पालकमंत्री नितेश राणे यांनी पाठवला आहे. पालकमंत्र्यांचा हा निरोप आल्यानंतर ग्रामस्थांनी महेश सारंग यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले. जर पालकमंत्री आमच्या पाठीशी आहेत, तर त्यांनी स्वतः आजगावमध्ये यावे, श्री देव वेतोबा मंदिरात ग्रामस्थांची बैठक घेऊन हा प्रस्तावित मायनिंग प्रकल्प हद्दपार करण्याची खात्री द्यावी आणि आपली भूमिका स्पष्ट करावी, असे थेट आवाहन ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना केले.
हा प्रस्तावित मायनिंग प्रकल्प गावातून हद्दपार करण्यासाठी केवळ राजकीय आश्वासनांवर अवलंबून न राहता, ग्रामस्थांनी पुढील दिशा ठरवली आहे. आपण सर्व ग्रामस्थ मिळून या मायनिंग विरोधात कायदेशीर व अहिंसेच्या मार्गाने, उपोषणाद्वारे आणि व्यापक जनजगृती करून हा प्रस्तावित मायनिंग प्रकल्प गावातून हद्दपार करणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. या बैठकीला उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनीही या दृष्टीने पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत आपले मार्गदर्शन केले. यावेळी दशक्रोशीतील सरपंच,उपसरपंच ,जिल्हा परिषद सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.