सावंतवाडी: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात निकृष्ट धान्याचा आरोप; पंचायत समिती सभेत संताप

शेअर करा

टोका लागलेल्या धान्याचा मुद्दा गाजला; पुरवठा तात्काळ थांबवून दोषींवर कारवाईचे आदेश, स्मार्ट मीटर व जलजीवन योजनेवरही जोरदार चर्चा.

सावंतवाडी,दि.१६ जुलै

शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच धान्य पोषण आहारासाठी दिलं जात आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याच्या हा प्रकार असून टोका लागलेल्या धान्याचं पोत घेऊन पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर यांनी पं.स. सभागृहात संबंधीतांवर आरोप केले. ठेकेदाराकडून उद्धट उत्तर मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी सभापती, उपसभापतींकडून आक्रमक पवित्रा घेत पुरवठा तात्काळ थांबवण्यासह दोषींवर कारवाईचे आदेश दिले. यावेळी स्मार्ट मीटर, आरोग्य समस्यांसह व जलजीवन वरून सभागृहात जोरदार चर्चा झाली.

येथील पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत सदस्य जितेंद्र गांवकर यांनी पोषण आहारासाठी शासनाकडून टोका लागलेलं धान्य दिल्याचा आरोप करत ते पोत सभागृहात सादर केले. माजगाव विद्यालयातील हा प्रकार असून उद्धट उत्तरे दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून हे धान्य लॅबमध्ये पाठवून अहवाल मागवा असे निर्देश उपसभापती गौरव मुळीक यांनी दिले. तर सभापती सुस्मिता जाधव यांनी तालुक्यातील पुरवठा तात्काळ थांबवा असे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. यावेळी मुलांच्या जीवाशी का खेळता ? हे सहन करून घेणार नाही. असे प्रकार होणार असतील तर जिल्हा परिषद शाळांत मुलं कशी पाठवावी ? असा सवाल प्राजक्ता केळुसकर यांनी केला. याप्रश्नी सदस्य शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये, अवनी राऊळ, प्रशांत सुकी, ऋतिका देसाई आक्रमक झाले. तर असा पुरवठा करणार असाल तर धान्य देऊ नका, मुलांच पोषण करण्यासाठी पालक सक्षम आहेत असंही श्री. गांवकर यांनी म्हटले. यावेळी संस्था सचिव लक्ष्मण नाईक, मुख्याध्यापक भाऊसाहेब चौरे उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांच्यासमोर हा प्रकार उघड करताच गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी कारवाईची ग्वाही दिली.

यावेळी तिलारीच पाणी मळगावसह इतर ६ गावांना का मिळत नाही ? जीवन प्राधिकरणाने हे काम करणं आवश्यक असताना जलजीवनला करण्यासाठी सांगितले गेले. मात्र, त्यांच्याकडे पैसेच नसून माझी अक्कल काढण्यापेक्षा ग्रामस्थांना पाणी कसं मिळेल, हे पाहण आवश्यक आहे. सभापतींनी यावर उत्तर द्याव, अशी मागणी उपसभापती गौरव मुळीक यांनी केली. ग्रामीण पाणीपुरवठाकडून लोकांना पाणी मिळण आवश्यक आहे. आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. ६ गावांना पाणी मिळाव यासाठी माझा प्रयत्न आहे‌. आरोस-दांडेली ते मळगावसाठीच अंदाजपत्रक तयार केलं आहे. पैसे जलजीवनमधून देणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांच्याकडे सध्या निधीच नाही आहे.‌ त्यामुळे मळगाव पर्यंतची लाईन जलजीवन मिशनमध्ये का घेता ? हा माझा प्रश्न आहे. आमसभेतही हा मुद्दा उपस्थित करणार असून टप्पा दोन सुरू असताना प्राधिकरणकडून आमच्या ६ गावांना पाणी पुरवठा होण आवश्यक आहे. पाणी घ्यायला आम्ही तयार आहोत. ही योजना तोट्यात असून लाईट बील देखील संबंधित विभाग भरू शकत नाही. त्यामुळे प्रसंगी पाण्यासाठी उपोषण करावे लागले तर ते देखील करेन, रेल्वे टर्मिनसला देखील हे पाणी मिळणार आहे. या पाण्यामुळे टर्मिनसचा प्रश्नही सुटेल असं मत श्री. मुळीक यांनी व्यक्त केले. यावेळी सभापती सुस्मिता जाधव यांनी सविस्तर माहिती घेऊन पुढील बैठकीत याचे उत्तर दिले जाईल. तसेच जलजीवनसाठी पालकमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. संबंधित विभागाचे वरिष्ठ आता उपस्थित नाहीत‌. जलजीवनची बैठक पुढे कुणी ढकलली ? हे देखील मला सांगाव, संबंधित अधिकारी बाहेरच्या बाहेर निघून गेले. त्यांना कुणी बाहेर काढलं ? असे सवालही त्यांनी करत या विभागाची बैठक लावण्यासाठी सुचना दिल्या. यावेळी संबंधित गावांच्या सरपंचाना देखील आमंत्रित करा अशी मागणी उदय पारिपत्ये यांनी केली.

या बैठकीत आरोग्य, परिवहन, बांधकाम, कृषी, वनविभाग, बी.एस.एन.एल आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसह बैठकीत चर्चा करण्यात आली. सदस्यांनी आपल्या सुचना मांडल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव, जितेंद्र गांवकर, मायकल डिसोजा, शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये, प्रशांत सुकी, महेश धुरी, प्राजक्ता केळुसकर, उत्कर्षा गांवकर, धनश्री मराठे, प्रणाली टिळवे, अवनी राऊळ, प्रथमेश सावंत, सदाशिव राणे, लतिका नाईक, प्रियांका देसाई आदींसह पंचायत समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



शेअर करा