​सावंतवाडी: आंबोलीत उद्या ‘आंबोली मान्सून मॅरेथॉन’चे आयोजन; पर्यावरणप्रेमींनी उपस्थित राहण्याचे मायकल डिसोझा यांचे आवाहन

शेअर करा

सावंतवाडी,दि.०१ ऑगस्ट

२ ऑगस्ट रोजी आंबोली येथे भव्य ‘आंबोली मान्सून मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सह्याद्री ॲडव्हेंचर ॲड्रेस क्यू ग्रुप’ (आंबोली-सांगली) आणि ‘सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडणार आहे. अध्यक्ष बाबल आल्मेडा आहेत.
​या मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा तीन गटांमध्ये धावपटू भाग घेणार आहेत. स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना रोख रक्कमेची बक्षिसे देऊन गौरविले जाणार आहे.
​विविध संस्था व मान्यवरांचे सहकार्य
​या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी के. एस. आर. ग्रुप केसरी, आमदार दीपक केसरकर मित्र मंडळ, विशाल सेवा फाउंडेशन, संजू परब मित्र मंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, राणे हॉस्पिटल (कुडाळ), सावंतवाडी पॅलेस, तसेच आंबोली व चौकुळ परिसरातील हॉटेल व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. याशिवाय सावंतवाडी व कुडाळमधील पत्रकार बंधू आणि सोशल मीडियानेही विशेष सहकार्य केले आहे.
​स्पर्धेला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा प्रयत्न
​ही मान्सून मॅरेथॉन एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी आणि स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजक पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील आहेत.
​”या भव्य उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पर्यावरणप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी आंबोलीत उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा द्याव्यात,” असे आवाहन शिवसेना आंबोली पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी केले आहे.

शेअर करा