सावंतवाडीत गांजा तस्करीचा प्रयत्न उधळला

शेअर करा

स्थानिक गुन्हे शाखेकडून चौघांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

​सावंतवाडी,दि.९ ऑगस्ट
सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे-बिलेवाडी रस्त्यावरील एका पडक्या घरात गांजा बाळगून त्याची देवाणघेवाण करणाऱ्या टोळीवर सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात चौघांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
​मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास कारीवडे बिलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या एका पडक्या घराच्या व्हरांड्यात काही जण अमली पदार्थांची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र आल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकला.
​या कारवाईदरम्यान सुनील श्रीकांत मुदगल (वय २६, रा. कारीवडे पेडवेवाडी), अमर मारुती धोत्रे (वय २३, रा. कारीवडे पेडवेवाडी) आणि चंद्रप्रकाश पलठण प्रजापती (वय ३४, रा. गवळीतीठा, मूळ रा. उत्तर प्रदेश) हे पोलीस पथकाच्या हाती लागले. तर विशाल वडर (वय २२, रा. सावंतवाडी) हा आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा हस्तगत केला आहे.
​या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश सहदेव कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांत एनडीपीएस ॲक्ट कलम ८(क) व २०(ब)ii(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस हवालदार श्रीमती परब यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला.
​घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हिंगे, पीएसआय श्री. हडळ व एलसीबी पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हिंगे करत आहेत. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेतला जात असून इतर आरोपींना अटक करण्याची तजवीज सुरू आहे, असे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

शेअर करा