सावंतवाडी दि.५ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७९ गाव इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्राचे ॲमेझाॅन फाॅरेस्ट म्हणून नव्याने प्रसिद्ध आलेल्या दोडामार्ग तालुक्याला संपूर्णपणे वगळण्यात आले आहे. दरम्यान दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील २५ गाव न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वी इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित झालेले आहेत.
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने सोळा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी दि २७ जुलै २०२६ रोजी पश्चिम घाटा संदर्भात इको सेन्सिटिव्ह एरिया जाहीर करण्याच्या दृष्टीने अधिसूचना जाहीर केली आहे.
“देर से आये दुरुस्त आये” या उक्तीप्रमाणे गेली कित्येक वर्षांपासून पश्चिम घाटातील जैवविविध निसर्ग रक्षण व्हावे यासाठी सहा राज्यांतील अनेक संस्था, पर्यावरण कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी ही आनंदाची बाब आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ अशा सहा राज्यांतून जाणाऱ्या १६०० किमी लांबीच्या आणि ४८ ते २१० किमी रुंदीच्या पश्चिम घाटामधील निसर्ग हा जागतिक पातळीचा जैवविविधता असलेला निसर्ग आहे आणि तो वाचावा म्हणून अनेक दशके संघर्ष सुरू होता.
युनेस्कोने या भागाला जागतिक वारसा स्थानामध्ये मानांकन दिलेले आहे.
या दरम्यान २०११ मध्ये डॉ माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली WGEEP ही केंद्रीय अभ्यास समिती नेमण्यात आली होती.
त्या समितीने आपल्या अहवालात पश्चिम घाटातील एकूण १६०००० चौरस किलोमीटर पैकी १२९०३७ चौरस किलोमीटर एवढा भूभाग इको सेन्सिटिव्ह जाहीर करण्यात यावा असे सांगितले होते.
ईको सेन्सिटिव्ह झोनचे १/२/३ असे तीन भागात विभागणी करून पश्चिम घाटातील जैवविविध निसर्गाचे नियोजन करण्यात यावे असे गाडगीळ समितीने आपल्या अहवालात म्हटले होते.
त्यानंतर दोन वर्षांनी २०१३ मध्ये केंद्राने डॉ कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नेमली आणि त्या समितीने पश्चिम घाटातील ६०००० चौरस किलोमीटर एवढाच भूभाग इको सेन्सिटिव्ह जाहीर करावा असं म्हटलं होतं.
या दोन समिती अहवालानंतर जवळपास तेरा वर्षांनी आता केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जी अधिसूचना काढली आहे त्या नुसार एकूण ५६८२५ चौरस किलोमीटर क्षेत्रात इको सेन्सिटिव्ह एरिया/झोन जाहीर करण्यात यावे असे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यातील जवळपास १७३४० चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र ईको सेन्सिटिव्ह जाहीर होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील २१, कणकवली मधील ३९, कुडाळ मधील ४०, सावंतवाडी मधील ५० आणि वैभववाडी मधील २९ गावांमध्ये ईको सेन्सिटिव्ह एरिया जाहीर होणार आहे.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे ॲमेझाॅन फाॅरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोडामार्ग तालुक्याला संपूर्णपणे वगळण्यात आले आहे.
साडे सात हजार ते बारा हजार वनस्पतींच्या,१६१ वन्यजीवांच्या,५२९ पक्ष्यांच्या,२४८ उभयचरांच्या,६००० कीटकांच्या आणि ३३० फुलपाखरांच्या विविध प्रजाती असलेल्या जागतिक वारसा स्थळ हे मानांकन लाभलेल्या पश्चिम घाटातील जैवविविध निसर्गाला शेवटी न्याय मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
अजूनही संपूर्णपणे डॉ माधव गाडगीळ समिती अहवाला प्रमाणेच पश्चिम घाटात निसर्गाचे रक्षण, संवर्धन व्हावे ही पर्यावरण शास्त्रज्ञ, कार्यकर्ते आणि नागरिकांची आग्रही मागणी आहे.
पर्यावरण कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी अमेझॉन चे फाॅरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोडामार्ग तालुक्याला नव्याने प्रसिद्ध झालेल्या आदेशातून वगळण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.