शोधमोहीम उद्या सकाळी ६ वाजता पुन्हा सुरू होणार
सावंतवाडी,दि.०४ ऑगस्ट
आंबोली येथील प्रसिद्ध महादेव गड पॉईंट येथे फिरण्यासाठी आलेले निपाणी (कर्नाटक) येथील एक डॉक्टर आयुब सय्यद
पर्यटक सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित डॉक्टर पर्यटक महादेव गड पॉईंट परिसराचा आनंद घेत असताना अचानक त्यांचा पाय घसरून ते खोल दरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम (आंबोली-सांगेली) आणि आंबोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
रेस्क्यू टीमकडून तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, दरी अत्यंत खोल असण्यासोबतच परिसरात पडणारा पाऊस आणि सर्वत्र पसरलेला काळोख यामुळे शोधमोहिमेत मोठे अडथळे निर्माण झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून ही शोधमोहीम तात्पुरती थांबवण्यात आली असून, उद्या बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे.
घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू असून आंबोली पोलिसांकडून घटनास्थळी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे आंबोली पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान या डॉक्टर सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे पोलीसांना चौकशीत सहकार्य करत आहेत.