Sawantwadi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा वाढीव उद्दिष्टासह विस्तार

शेअर करा

सावंतवाडी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे सभापती सुस्मिता जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे आवाहन

​सावंतवाडी,दि.१५ ऑक्टोबर
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांच्या आर्थिक व कृषी विकासासाठी सन २०१७-१८ पासून राबविण्यात येणारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ सन २०२६-२७ या वर्षासाठी वाढीव उद्दिष्टासहित कार्यान्वित करण्यात आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती श्रीम. सुस्मिता जाधव, उपसभापती श्री. गौरव मुळीक व गटविकास अधिकारी श्री. निलेश जाधव यांनी केले आहे.
​योजनेचे उद्दिष्ट व मिळणारे अनुदान:
​शेतकऱ्यांना सिंचन क्षमता निर्माण करणे, सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. योजनेअंतर्गत घटकानुसार खालीलप्रमाणे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे:
​नवीन विहीर: ₹ ४.०० लाख
​जुनी विहीर दुरुस्ती: ₹ १.०० लाख
​पंपसंच: ₹ ४० हजार
​वीज जोडणी: ₹ २० हजार
​सोलर पंप: ₹ ५० हजार
​शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण: ₹ २.०० लाख
​पात्रता आणि अटी:
​लाभार्थ्याकडे स्वत:च्या किंवा कुटुंबाच्या नावे नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर आणि इतर घटकांसाठी ०.२० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
​०.४० हेक्टरपेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी लगतच्या त्याच संवर्गातील शेतकऱ्यासोबत करारनामा करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.
​आवश्यक कागदपत्रे: अ.जा./नवबौद्ध जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची प्रत, फार्मर आयडी / ॲग्रीस्टॅक नंबर.
​या योजनेत महिला व दिव्यांग लाभार्थ्यांना निवडीत प्राधान्य दिले जाईल.
​इच्छुक लाभार्थ्यांनी शासनाच्या mahadbhtmait.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाशी थेट संपर्क साधावा, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

शेअर करा