सावंतवाडी : अचानक आलेल्या पुरात शेतकरी अडकले; अंबोली रेस्क्यू टीमच्या तत्परतेने सर्वांची सुखरूप सुटका

शेअर करा

सावंतवाडी ,दि.१७ जुलै

आंबोली परिसरात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या पुरामुळे नांगरतास वाडी येथील शेतात काम करणारे काही शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ नदीपलीकडे अडकून पडले. मात्र अंबोली रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसानंतर सायंकाळच्या सुमारास आंबोली परिसरात अतिवृष्टी झाली. डोंगर उतारावरील मोठ्या प्रमाणातील पाणी काही क्षणांत नदीत आल्याने नदीला अचानक पूर आला. त्यावेळी नदीच्या पलीकडे असलेल्या शेतात काही शेतकरी व महिला शेतीची कामे करत होते. पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने त्यांना नदी ओलांडून परत येणे अशक्य झाले आणि ते शेतातच अडकून पडले.

या घटनेची माहिती मिळताच अंबोली रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रेस्क्यू टीमचे मायकल डिसोझा, उत्तम नार्वेकर , नारायण चव्हाण , राजू राऊळ सुजित चिल्लू तसेच इतर ग्रामस्थांनी लाईफ जॅकेट, सुरक्षा दोर व आवश्यक बचाव साहित्य घेऊन बचावकार्य सुरू केले. योग्य नियोजन आणि अत्यंत सावधगिरी बाळगत त्यांनी एकामागोमाग एक सर्व शेतकरी व महिलांना पुराच्या प्रवाहातून सुरक्षितपणे नदीच्या अलीकडील बाजूस आणले.

ही संपूर्ण घटना सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. अंबोली रेस्क्यू टीमच्या धाडसी आणि तत्पर बचावकार्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, या बचावकार्याबद्दल परिसरातील ग्रामस्थांकडून अंबोली रेस्क्यू टीमचे कौतुक करण्यात येत असून, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे तसेच पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न घेता नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे.

शेअर करा