आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याच्या पोलिसांच्या नोटीसा; सरकारचा प्रकल्प पुढे रेटून नेण्यासाठी दुपट्टी खेळ.
मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांची टिका.
सावंतवाडी,दि.०२ जुलै
देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याच्या नोटीसा देण्यात आल्या असून हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारी यंत्रणा आता पोलिसांची मदत घेत असल्याचे दिसून येत आहे. सनदशीर व लोकशाहीच्या मार्गाने आपल्या न्याय मागण्यासाठी शेतकरी, आंबा काजू बागायतदार , मच्छीमार बांधव हा लढा उभारत आहेत या सर्वांना सामोरे जाण्याचे सोडून हे आंदोलन दडपून टाकण्याची व आंदोलकर्त्यांवर दबाव आणण्याची खेळी आता सरकारतर्फे खेळली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र शेतकरी व सर्वसामान्य जनता या दबावाला बळी पडणार नाही.विधिमंडळात उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी अद्याप जागा निश्चित करण्यात आली नसल्याचे वक्तव्य केले आहे तर खासदार महोदय या प्रकल्पाला कोण विरोध करतो तेच मी बघतो अशा धमक्या देत आहेत हे दुपट्टी धोरण राबवून प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर खेळला जात असल्याची टिका जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.