सावंतवाडी : उद्घाटन पूर्वीच नाणोस-तीरोडा पुलाला मोठे तडे; १५ ऑगस्टला उपोषणाचा नाणोस ग्रामपंचायतीचा इशारा

शेअर करा

सावंतवाडी,दि.०७ ऑगस्ट
नाणोस आणि तीरोडा या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून तो धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून तांत्रिक चौकशी करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा नाणोस ग्रामपंचायतीने दिला आहे.
​याबाबत नाणोस ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. साक्षी शेटये, उपसरपंच अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत सदस्या रसिका जोशी, ग्रामस्थ सुधाकर नाणोसकर आणि रघुनाथ जोशी यांच्या स्वाक्षरीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे.


​दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सदर पूल हा दैनंदिन वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून यावरून ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांची मोठी रहदारी असते. मात्र, उद्घाटनाआधीच पुलाच्या विविध भागांत मोठ्या भेगा पडल्याने पुलाच्या मजबुतीवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे भविष्यात मोठा अपघात अथवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा किंवा तांत्रिक त्रुटी राहिल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
​या कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर त्वरित प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, तसेच पुलाची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करून सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी निवेदनावारे करण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत यावर योग्य कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी नाणोस ग्रामस्थ लोकशाही मार्गाने उपोषण व तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

शेअर करा