सावंतवाडी,दि.०२ जुलै
चितारआळी येथील रहिवासी नामदेव तुकाराम उर्फ जीजी गावडे (वय ६०, मूळ रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काल बुधवार, १ जुलै रोजी सकाळी १२ वाजताच्या सुमारास गोवा-बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणजत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सावंतवाडी व शिरोडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जीजी गावडे यांनी सावंतवाडी येथील शालेय शिक्षणानंतर पंचम खेमराज महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी विविध छोटे-मोठे व्यवसाय केले. ते बरीच वर्षे सावंतवाडीत वास्तव्यास होते, मात्र गेल्या ४-५ वर्षांपासून ते आपल्या मूळ गावी शिरोडा येथे स्थायिक झाले होते.
सावंतवाडी, शिरोडा आणि तळवडे भागात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, जावई आणि मेहुणे असा परिवार आहे.
आज गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शिरोडा येथील मूळ गावच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.