Sawantwadi news: सातार्डा येथे तेरेखोल नदीत मायलेकाने उडी घेतल्याची घटना; परिसरात खळबळ!

शेअर करा

श्रुतिका आरोंदेकर (५५) आणि मुलगा सुहास आरोंदेकर (२६) यांचा शोध सुरू; सावंतवाडी पोलीस व गोवा पोलिसांकडून शोधकार्य सुरू!

सावंतवाडी ,दि.२५ ऑक्टोंबर

सातार्डा रायाचेपेड येथील तेरेखोल नदी पात्रात रविवारी पहाटेच्या सुमारास आई आणि तिच्या मुलाने उडी घेतल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (वय ५५) आणि त्यांचा मुलगा तुकाराम उर्फ सुहास श्यामसुंदर आरोंदेकर (वय २६, रा. सातार्डा) असे नदीत उडी घेतलेल्या मायलेकाची नावे आहेत. या घटनेमुळे सातार्डा परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
​रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. नदीकिनारी दोघांची चप्पल आढळून आल्याने स्थानिक नागरिकांच्या संशय बळावला आणि त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. तेरेखोल नदीपात्रात गोवा पोलिसांच्या मदतीने आणि स्थानिकांच्या साहाय्याने मायलेकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
​घटनास्थळी पोलिस पाटील विनिता मयेकर, सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सातार्डा बीट अंमलदार टकेकर यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते. तसेच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर आणि पंचायत समिती सदस्य उदय परिपत्त्ये यांनीही घटनास्थळी भेट दिली. उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता.

शेअर करा