​सावंतवाडी : ‘उद्धव ठाकरेंवर आता कोणाचाही विश्वास उरलेला नाही; ‘ऑपरेशन टायगर’ सातत्याने सुरूच राहणार’ – आमदार निलेश राणे

शेअर करा


​सावंतवाडी ,दि.१३ जून

“शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक जण पक्षात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ ही केवळ एक-दोन महिन्यांची मोहीम नसून, ती सातत्याने सुरूच राहणार आहे,” असा दावा आमदार निलेश राणे यांनी केला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.
​माध्यमांशी बोलताना आ. निलेश राणे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे केवळ बैठका घेण्याचे काम करत आहेत. त्यांच्या बैठकांना नेमके किती आमदार आणि खासदार उपस्थित असतात, हे आधी मोजले पाहिजे. कधीतरी दोन महिन्यांतून एकदा बाहेर पडायचे आणि केवळ वक्तव्ये करायची, या पलीकडे त्यांच्याकडे काहीही उरलेले नाही. जनता आणि लोकप्रतिनिधी आता त्यांच्या या भूमिकेला कंटाळले आहेत, असे ते म्हणाले.
​उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा वेग आणि त्यांच्याकडून प्रत्येकाला मिळणारा न्याय यांमुळे विविध पक्षांतील लोक आज आमच्याकडे आकर्षित होत आहेत. लोकांचा शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. याउलट, विरोधी पक्षातील नेत्यांकडे आता कोणतेही भविष्य राहिलेले नाही. त्यामुळेच ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत येत्या काळातही अनेक मोठे प्रवेश पाहायला मिळतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेअर करा