Sawantwadi : थकीत १२ महिन्यांच्या पगारासाठी एनटीसी गिरणी कामगारांचा कुलाबा कार्यालयावर एल्गार

शेअर करा

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू; १ महिना ११ दिवस उलटूनही निर्णय नाही.

सावंतवाडी,दि.१२ ऑक्टोबर

एनटीसी गिरणी कामगारांचा गेल्या १२ महिन्याचा थकीत पगार मिळालाच पाहिजे,ही प्रमुख मागणी समोर ठेवून मुंबईतील चार एनटीसी मिल कामगारांचा गिरण्यांच्या गेटवर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने ७ सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू आहे.१महिना ११ दिवस उलटून गेले तरी व्यवस्था पनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.या‌ विरुद्ध सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आज आकस्मिक कुलाबा येथील एनटीसी‌ कार्यालयावर एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला होता.त्या प्रमाणे आज सकाळी ९.३० वाजल्यापासून एनटीसी कार्यालयावर कामगारांनी एल्गार पुकारला.
‌ गेल्या १२ महिन्याचा पगार मिळालाच पाहिजे! कोण म्हणतो देणार नाय,घेतल्या शिवाय रहाणार नाय!अशा घोषणा देत कामगारांनी आज कुलाबा,बेलार्डपिअर येथील एनटीसी कार्यालय‌ दणाणून सोडले.आजच्या आंदोलनात पुरूष कामगारां प्रमाणे महिला कामगारांचाही मोठा सहभाग होता
आज महाव्यवस्थापक एस.एस.वासन आणि महाव्यवस्थापक अंकीत शर्मा यांची खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण,सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आणि संघटन सेक्रेटरी दीपक राणे,गजानन कदम, बबनआसवले, प्रकाश भोसले आदींनी भेट घेतली.कंपनीचे कार्यकारी अधिकारी पी.कुगुमाराजू कंपनीच्या कामा निमित्ताने बाहेर आहेत.त्यामुळे वरील महाव्यवस्थापकांची रा.मि.म. संघ पदाधिकाऱ्यांनी आज भेट घेतली.आपल्या भेटीत उपासमारीने त्रस्त असलेल्या कामगारांच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या.दसरा-दिवाळी सारख्या महत्त्वाच्या सणाच्या तोंडावर कामगारांना पगारापोटीची सर्व थकबाकी दिली पाहिजे, हा आग्रह दिल्ली,एनटीसी कार्यालयाकडे कळविण्याचा पदाधिकाऱ्यां वतीने आग्रह करण्यात आला आहे.
जोपर्यंत ठाम निर्णय घेतला जाणार नाही,तो पर्यंत आंदोलन चालू राहील,असे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या वतीने जाहीर केले.कामगार आपल्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढतील परंतु काहीही झाले तरी कायदा हातात घेतला जाणार नाही,असेही‌ निवृत्ती देसाई यांनी संघटनेच्या वतीने सांगितले.
मुंबईमधील (१)टाटा (२) इंदू मिल क्रमांक५ (३) पोद्दार आणि (४) दिग्विजय या गिरण्यांवर एक महिन्या पेक्षा अधिक काळ आंदोलन सुरू आहे.
एनटीसी कामगारांना ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ पर्यंत पगार देणे बाकी आहे.सन २०२५ मध्ये निवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅच्युइटी मिळालेली नाही.कामगारांचे घर भाडे भत्ता,प्रवास भत्ता,इत्यादी कायदेशीर देणी मिळावयाची आहेत.बाहेरील कामगारांना जून २०२२ पर्यंत पूर्ण पगार व जुलै २०२३ नंतर फक्त पन्नास टक्के पगार देण्यात आला आहे,अशा मागण्या कामगारांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगार नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिल्ली येथे केंद्र सरकारची भेट घेतली होती.
जोपर्यंत ठाम‌‌ निर्णय नाही तोपर्यंत गिरण्यावरील आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय‌ आज घेण्यात आला आहे

शेअर करा