सावंतवाडी, दि. २ जुलै
सावंतवाडी रोटरी क्लबच्या सन २०२६-२७ या वर्षाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी प्रवीण परब, सेक्रेटरीपदी सुहास सातोसकर तर खजिनदारपदी प्रसाद शेवडे यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लबचा वार्षिक शपथग्रहण सोहळा येत्या सोमवार, दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजता मळगाव येथील भगवती हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नूतन अध्यक्ष प्रवीण परब यांनी दिली. या सोहळ्याला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विश्वनाथ कदम व असिस्टंट गव्हर्नर अभिषेक माने प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
आज पत्रकार परिषदेत प्रवीण परब यांनी माहिती दिली.या प्रसंगी रोटरीयन अनंत उचगावकर, नूतन अध्यक्ष प्रवीण परब, मावळते अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ भांबुरे, नूतन सेक्रेटरी सुहास सातोसकर, आबा कशाळीकर, सत्यजित देशमुख धारणकर, प्रदीप शेवडे, अॅड. जायबा धुरी आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला मावळते अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांनी आपल्या कार्यकाळातील वर्षभरात राबविलेल्या विविध सामाजिक व रचनात्मक उपक्रमांचा आणि कामांचा आढावा घेतला.
यावेळी आगामी वर्षातील उपक्रमांविषयी माहिती देताना नूतन अध्यक्ष प्रवीण परब म्हणाले की, जागतिक पातळीवर रोटरी क्लब १२५ वर्षे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५४ वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. या परंपरेला साजेसे असे प्रभावी काम चालू वर्षी करण्याचा आमचा मानस आहे. सद्यस्थितीत शाळकरी मुलांना मोबाईलच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी क्लबतर्फे विशेष प्रयत्न केले जातील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या मान्यवरांना आमंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
पुढे बोलताना परब यांनी सांगितले की, शाश्वत शेती आणि बागायती संदर्भात शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले जाईल. यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक प्रशासकीय संस्थांना सोबत घेऊन काम केले जाईल. रोटरीतर्फे आतापर्यंत २०० बायोगॅस प्रकल्प उभारून देण्यात आले असून, चालू वर्षात आणखी ५०० बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा संकल्प आहे. यासोबतच सामाजिक बांधीलकीतून इतरही विविध स्तरांवर समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातील.
कार्यक्रमाचे आभार नूतन सेक्रेटरी सुहास सातोसकर यांनी मानले. ६ जुलै रोजी होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्याला रोटरी सदस्यांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी परिवारातर्फे करण्यात आले आहे.