सावंतवाडी : आंबोलीत विजेच्या धक्क्याने गाभण म्हैस आणि रेडकू ठार

शेअर करा

महावितरणकडून पंचनामा : शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

सावंतवाडी ,दि.०२ जुलै

येथील मुळवंदवाडी भागात जमिनीवर पडलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने एका गाभण म्हशीसह रेडकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, मुळवंदवाडी येथील शेतकरी भिसाजी महादेव सरमळकर यांची गुरे शेतात चरण्यासाठी गेली होती. यावेळी शेतात तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने गाभण म्हैस आणि रेडकू यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिक गणपत गावडे यांनी प्रसंगावधान राखत इतर जनावरांना पुढे जाण्यापासून रोखल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
​ घटनेची माहिती मिळताच महावितरण आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली. प्रशासनाच्या वतीने मृत गुरांचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून, बाधित शेतकरी सरमळकर यांना नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने गुरांचे मृतदेह ताब्यात घेतले.
​ दरम्यान, आंबोलीतील नांगरतास भागात नव्याने बसविण्यात आलेले विद्युत पोल धोकादायक स्थितीत असल्याकडे स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महावितरणने या भागात तत्काळ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

शेअर करा