सावंतवाडी,दि.१ सप्टेंबर
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या आंबोली ते हिरण्यकेशी या रस्त्याची अवघ्या दोन महिन्यांतच दुरवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या निकृष्ट कामाची शासकीय तज्ज्ञ यंत्रणेमार्फत चौकशी करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. आंबोली ते हिरण्यकेशी रस्त्याचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आले होते. जून २०२६ मध्ये हे काम पूर्ण झाले. नियमानुसार पुढील ५ वर्षे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या २ महिन्यांतच रस्ता खचला असून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
या कामाचे स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे, कंत्राटदाराकडूनच खड्डे बुजवून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा आणि कंत्राटदाराने टाळाटाळ केल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
निवेदन प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे, आंबोली शाखा अध्यक्ष रामचंद्र अमृसकर आदी उपस्थित होते.